चौथ्यांदा मुदतवाढ तरीही प्रतिसाद थंड ! अजूनही निम्म्याहून अधिक वाहने 'एचएसआरपी'विना, डेडलाईन केव्हा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 18:24 IST2025-11-11T18:20:57+5:302025-11-11T18:24:04+5:30
Gondia : सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (एचएसआरपी) बसवण्याची अंतिम मुदत केवळ २० दिवसांवर येऊन ठेपली आहे.

Even after the fourth extension, the response is still cold! More than half of the vehicles are still without 'HSRP', when is the deadline?
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (एचएसआरपी) बसवण्याची अंतिम मुदत केवळ २० दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, जिल्ह्यातील तब्बल ५२ टक्क्यांहून अधिक जुन्या वाहनांना अद्यापही ही नवी नंबर प्लेट बसविण्यात आलेली नाही. चौथ्यांदा देऊनही मुदतवाढ प्रतिसाद थंड असल्याने १ डिसेंबरपासून जवळपास १ लाख वाहने कारवाईच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे. एचएसआरपी बसवण्याची मोहीम १ जानेवारी २०२५ पासून सुरू झाली. सुरुवातीला ३१ मार्च, नंतर ३० जून, १५ ऑगस्ट आणि आता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली, तेव्हा एचएसआरपी बसविल्याचे प्रमाण जवळपास ३० टक्के होते. परंतु, त्यानंतरच्या तीन महिन्यांच्या कालावधीत जवळपास ३० टक्के वाहनांनाच या प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत. आरटीओ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यात सन २०१९ पूर्वीची १ लाख ८० हजार वाहने आहेत. यापैकी आतापर्यंत ही नंबर प्लेट लावण्यासाठी ९५०२४ वाहनधारकांनी यासाठी नोंदणी केली आहे. तर ६९५४८ वाहनांना ही नंबर प्लेट लावण्यात आली आहे.
जवळपास १ लाख वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लागणे शिल्लक आहे. त्यामुळे २० दिवसांची मुदत आणि ५२ टक्के वाहनांना एचएसआरपी नसल्याने परिवहन विभागाची चिंता वाढली आहे. त्यामुळे या वाहनचालकांना आता कारवाईला सामोरे जाण्याची शक्यता बळावली आहे.
१५०० रुपये दंड
१ डिसेंबरनंतर कोणतीही मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर पहिल्या गुन्ह्यामध्ये ५०० रुपये, तर दुसऱ्या गुन्ह्यात १ हजार ५०० रुपये दंडाची तरतूद आहे.
१ डिसेंबरपासून कारवाईची टांगती तलवार
- वाहन सुरक्षेसाठी एचएसआरपी अनिवार्य आहे.
- यामध्ये वाहनाचा क्रमांक लेझर तंत्रज्ञानाने प्रिंट केलेला असतो आणि 'नॉन-रिमुव्हेबल स्नॅप लॉक्स' वापरलेले असतात.
- ज्यामुळे ही प्लेट काढणे किंवा 3 बदलणे अत्यंत कठीण होते.
- ३० नोव्हेंबरची मुदत संपल्यानंतर १ डिसेंबरपासून आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई सुरू केली जाणार आहे.
- त्यामुळे वाहनचालकांनी मुदतीपूर्वीही नंबर प्लेट लावून घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी कळविले.