भरधाव ट्रकची कारला धडक, चालक जागीच ठार; आमगाव तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2022 16:53 IST2022-05-05T16:46:26+5:302022-05-05T16:53:28+5:30
ही घटना आज पहाटेच्या सुमारास आमगाव येथील पेट्रोल पंपासमोर घडली.

भरधाव ट्रकची कारला धडक, चालक जागीच ठार; आमगाव तालुक्यातील घटना
आमगाव (गोंदिया) : तालुक्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील लांजीवरून नागपूरकडे जात असलेल्या ब्रेझा या चारचाकीला ट्रक ट्रेलरने दिलेल्या धडकेत वाहनचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना आमगाव-गोंदिया मार्गावरील महाकाली पेट्रोलपंपसमोर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
साकेत गेंदलाल वानखेडे (३६) रा. नागपूर मृत वाहनचालकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, साकेत वानखेडे हे लांजी येथे नोकरीला असून, ४ एप्रिलला मध्यरात्री लांजीवरून आमगाव-गोंदिया मार्गे स्वतः पांढऱ्या रंगाची ब्रेझा गाडी (एमएच ३५, आर ५५९५) ने नागपूरकडे जात असताना आमगाव किडंगीपार नाल्याजवळील महाकाली पेट्रोलपंपसमोर गोंदियाकडे जाणाऱ्या ट्रक ट्रेलर वाहन (एनएल ०२, एल ३६३१) ने धडक दिली. यात ब्रेझाचालक साकेत वानखेडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. पुढील तपास आमगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजू गजपुरे करीत आहेत.
रस्ता बांधकामामुळे अपघातात वाढ
आमगाव-गोंदिया मार्गावर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवला असल्याने रात्रीच्या सुमारास अनेक अपघात घडलेले आहेत. रस्त्याचे बांधकाम कोणत्याही एका बाजूने आधी पूर्ण करण्याची गरज होती; मात्र कंत्राटदाराने तसे न करता दोन्ही बाजूने रस्ता खोदून बांधकाम सुरू ठेवले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.