संजय राऊतांना राहुल गांधी कुणाचे गोडवे गातात हे दिसत नाही का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:29 IST2025-08-07T12:27:15+5:302025-08-07T12:29:27+5:30
दादा भुसे यांचा सवाल : एकनाथ शिंदे पंतप्रधानांना भेटतात यात गैर काय

Doesn't Sanjay Raut see whose praise Rahul Gandhi is singing?
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्याचे उपमुख्यमंत्री, शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे हे वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करीत आहेत. यावरून खा. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी देशाचे पंतप्रधान दिल्लीत राहतात त्यांना भेटायला जाण्यात गैर काय आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे अमेरिकेत जाऊन भारताविरुद्ध गरळ ओकतात, पाकिस्तानचे गोडवे गातात तेव्हा त्यांना हे सर्व दिसत नाही का, असा सवाल शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी संजय राऊतांना केला.
राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे हे बुधवारी (दि. ६) गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून विरोधकांच्या पोटात का दुखणे सुरू होते, हे कळत नाही. महाराष्ट्रातील विकासकामांसंदर्भात आणि पक्षाच्या कामासाठी दिल्लीला जावे लागते. देशाचे पंतप्रधान हे दिल्लीत असतात. त्यामुळे त्यांची भेट घेण्याकरिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जात असतात, यात काहीच गैर नाही. विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते टीका करीत असल्याचा आरोप भुसे यांनी केला.
जि. प. शाळांमधील पटसंख्या वाढली
गोंदिया जिल्ह्यातील जि. प. शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली आहे. ही निश्चितच चांगली बाब आहे; पण काही बाबतीत अजून सुधारणा करण्याची गरज आहे. त्यासंदर्भातील सूचना शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत केल्या असल्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
उपक्रमशील शिक्षकांच्या प्रयोगांची दखल
गोंदिया जिल्हा परिषद सभागृहात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी सायंकाळी आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील काही शिक्षक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत, त्याचे सादरीकरण करण्यात आले. या नावीन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत याचा इतर शाळेतील विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.