ज्येष्ठांच्या देखभालीकडे होतेय मुलांचे दुर्लक्ष, तक्रारीत झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 15:40 IST2025-01-30T15:36:20+5:302025-01-30T15:40:11+5:30

ज्येष्ठांची हेळसांड : म्हातारपणात होतोय त्रास

Children are being neglected in the care of the elderly, complaints have increased | ज्येष्ठांच्या देखभालीकडे होतेय मुलांचे दुर्लक्ष, तक्रारीत झाली वाढ

Children are being neglected in the care of the elderly, complaints have increased

नरेश रहिले 
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
माणूस आयुष्यभर धनसंचयाच्या मागे धावत असल्याने याच्या नादात लेकरांवर संस्कार करण्यात कमी पडतात. यामुळे कमावलेले धनही त्यांना उतार वयात उपभोगता येत नाही. त्यासाठी दोन पैसे कमी कमवा, परंतु मुलांना संस्कारक्षम बनवा, असे अनेक वृध्दांना आता वाटत आहे. आयुष्याच्या सायंकाळी ज्येष्ठांना आधाराची गरज असताना घरातीलच लोकांकडून त्यांची उपेक्षा होत असल्याने आता काय करू साहेब, असा सवाल वृध्द मंडळी करीत आहेत.


जसजसे वय वाढत जाते, तसतसे विविध आजार जडतात. वृद्धापकाळात मुलगा, सुनेचा आधारच हवा असतो. मात्र, बऱ्याच वेळा ज्येष्ठांना समजून घेतले जात नाही. त्यामुळे रक्ताची नाती त्यांच्यापासून दुरावतात. मुलगा, सूनही लक्ष देत नाहीत. अशावेळी ज्येष्ठांना पोलिस ठाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यानंतर घरच्यांच्या विरोधात तक्रार केली जाते. काही वृध्द अन्याय मुकाट्याने सहन करून आत्महत्येचाही मार्ग पत्करतात. आयुष्यात धन कमावण्याकडे लक्ष देऊन मुलांना संस्कार देण्याची वेळ गमावल्याने म्हातारपणात आपल्याच घरात त्यांना अपमान सहन करावा लागतो. 


३२० तक्रारी गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यांची परिस्थिती पाहता ३२० तक्रारी वृध्दांनी डायल ११२ वर केल्या आहेत. या तक्रारीचे निवारण केले जात आहे.


ज्येष्ठांच्या तक्रारी काय?
उतारवय आले की, त्या व्यक्तीचे कुणीच ऐकायला तयार नाही. आपल्या हातात पैसा असला तर मुलगा आणि सून काही प्रमाणात त्यांचे करते. पेन्शन नसलेल्या व्यक्तींची उपेक्षा मोठ्या प्रमाणात होते. सून सासू - सासऱ्यांना हिन वागणूक देते. त्या वागणुकीतून वृध्दांच्या डोळ्यात अश्रू येतात. काही सुना आपल्या सासू -सासऱ्यांना धक्काबुक्की देतात. हाताचा ठोसा मारतात. जेवण देत नाही, असा अनेक प्रकारचा छळ करतात, अशा तक्रारी आहेत.


समुपदेशनातून केली जातेय अनेक प्रकरणात तडजोड
ज्येष्ठांच्या तक्रारी पोलिस ठाण्यापर्यंत आल्या तरी त्या सहजतेने मिटतात. आपणच जन्माला घातलेली मुले आपल्यासोबत गैरव्यवहार करतात, त्यात आपणच त्यांना संस्कार देण्यात कुठे तरी कमी पडलो. त्यांनी आपल्याला नाकारले तर या वयात आपल्याला मदत कोण करणार, अंगात ताकद नाही, मग जीवन कसे जगाणार, यामुळे ते तडजोड करतात. 


वृध्दांना मुलांकडून देखरेखीची अपेक्षा, पण होतेय निराशा
आयुष्यभर मर-मर करून कमावलेले धन हे माझ्या मुला-बाळांना व्हावे, यासाठी झटणारे आई - वडील उतारवयात घरातच परके होऊन जातात. ज्यांनी आपल्या हातावर कमावलेले धन मुलांना होईलच, परंतु आपल्याही कामात येईल, मी कमावले माझे धन अखेरपर्यंत माझ्याही कामात यावे, मुला-बाळांनी माझी देखरेख करावी, अशी अपेक्षा वृध्दांना असते. पण त्यांची ही अपेक्षा फोल ठरत असल्याचे वृध्दांच्या वाढत्या तक्रारींवरुन दिसून येत आहे. त्यामुळे मुलांनी आपल्या आई-वडीलांची त्यांच्या उतारवयात काळजी घेण्याची गरज आहे.


"माणसाची खरी संपत्ती हे त्याचे पूत्रधन आहे. परंतु, मुलांना योग्यवेळी योग्य संस्कार न दिल्यास उतारवयात त्या मुलांकडून पालकांना अपमानित केले जाते. यासाठी धन संचयापेक्षा मुलांमध्ये संस्कार रूजवा, तर उतारवयात त्रास होणार नाही."
- ह.भ.प. मुक्ता हत्तीमारे, खोबा-कोकणा
 

Web Title: Children are being neglected in the care of the elderly, complaints have increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.