१९ कोटी ६९ लाखांचा अर्थसंकल्प; शिक्षण, महिला, दिव्यांगांवर असेल लक्ष!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:35 IST2025-03-12T16:34:39+5:302025-03-12T16:35:17+5:30
सर्वाधिक तरतूद : जि.प.च्या मालमत्तेचे करणार सर्वेक्षण, योजनांच्या पुर्ततेची दिली ग्वाही

Budget of 19 crore 69 lakhs; Focus will be on education, women, disabled!
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषदेचा सन २०२४-२०२५ चा सुधारीत ३४ कोटी ७८ लाख ४५ हजार रुपयांचा व २०२५-२६ चा १९ कोटी ६९ लाख ७५ हजार रुपयांच्या संभाव्य खर्चाचा अर्थसंकल्प जि.प. अर्थ सभापती डॉ. लक्ष्मण भगत यांनी मंगळवारी (दि. ११) सभागृहात सादर केला. यात शिक्षण व महिला बाल कल्याण विभागासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे,
जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा मंगळवारी दुपारी १ वाजता जि.प.च्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरू सुरुवात झाली. जि.प. बांधकाम तथा अर्थ सभापती डॉ. लक्ष्मण भगत व मुख्य लेखा वित्त अधिकारी जनार्दन खोटरे यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी जि.प. उपाध्यक्ष सुरेश हर्षे, कृषी व पशुसंवर्धन सभापती दीपा चंद्रिकापुरे, महिला बालकल्याण सभापती पौर्णिमा ढेंगे, समाजकल्याण सभापती रजनी कुंभरे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरंगनथन, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुतीरकर यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. अर्थसंकल्पात समाज कल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा, महिला व बाल कल्याण व दिव्यांग कल्याणासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली. जिल्हा परिषदेचे वर्षातील सुधारित उत्पन्न २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात १६ कोटी ३ लाख ७७हजार रुपयाचे मूळ अंदाजपत्रक होते. ते सुधारित करून ३४ कोटी ७८ लाख ४५ हजार रुपयाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.
घड्याळी तासिका शिक्षकांसाठी ५० लाख रुपयांची तरतूद
घड्याळी तासिकेवरील शिक्षक नियुक्तीकरीता सुधारित अंदाजपत्रकात ८४ लाख रुपये, तर २०२५-२६ च्या संभाव्य अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अटल क्रीडा स्पर्धेकरिता सुधारीत अंदाजपत्रकात ४० लाख रुपये, तर संभाव्य अंदाजपत्रकात २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
जि.प. सदस्यांकरिता ३ कोटी १८ लाख रुपयांची तरतूद
जिल्हा परिषदेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी, याकरिता दुकान गाळे बांधकामाकरिता २०२५-२६ च्या संभाव्य अर्थसंकल्पात ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जि.प. सदस्यांच्या स्थानिक विकास निधीकरिता २०२५-२६ या वर्षाकरिता ३ कोटी १८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तकेसाठी विशेष तरतूद
विद्यार्थ्यांना ओळखपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, बौद्धिक स्पर्धा, शाळेकरिता पाण्याची व शौचालयाची व्यवस्था आणि स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध करून देण्याकरिता नवीन लेखाशीर्ष तयार करण्यात आले आहे. त्यासाठी संभाव्य अंदाजपत्रकात २.२० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पात महिला बालकल्याण, समाजकल्याण, पाणीपुरवठा आणि कृषी विषयक योजनांवर तरतूद करण्यात आली आहे.
अशी आहे विभागनिहाय निधीची तरतूद
- सार्वजनिक मालमत्तेच्या परीरक्षणाकरिता : ६ कोटी ७६ लाख
- शिक्षण विभाग : २ कोटी २० लाख
- आरोग्य विभागाकरीता ८६ लाख ७५ हजार रुपये
- समाजकल्याण विभाग, मागासवर्गीयांच्या कल्याणसाठी योजनेकरीता ७० लाख ६० हजार
- दिव्यांग कल्याणासाठी ५ टक्के निधी अंतर्गत १९ लाख रुपये
- महिला बाल कल्याण विभागाकरीता १ कोटी ३२ लाख
- कृषी विभागाकरिता १ कोटी ४१ लाख
- पशुसंवर्धन विभागाकरिता ७३ लाख
- सामान्य प्रशासन विभागाकरिता २ कोटी ४७ लाख ९
- वित्त विभागाकरिता ६० लाख ५१ हजार १० रुपये
- ११ पंचायत विभागाकरिता ७८ लाख ६२ हजार
- लघु पाटबंधारे विभागाकरिता ९२ लाख ५४ हजार रुपये