गोंदिया जिल्ह्यातील तब्बल ८ हजार ४६० शेतकऱ्यांचा बोनस अडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 18:47 IST2025-08-12T18:46:17+5:302025-08-12T18:47:57+5:30

संस्थांनी हुंड्या जमा न केल्याने अडचण : शेतकऱ्यांना करावी लागतेय प्रतीक्षा

Bonus of 8,460 farmers in Gondia district has been delayed | गोंदिया जिल्ह्यातील तब्बल ८ हजार ४६० शेतकऱ्यांचा बोनस अडला

Bonus of 8,460 farmers in Gondia district has been delayed

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस दोन हेक्टरपर्यंत जाहीर केला. त्यासाठी जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार १३ शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनस जमा करण्यात आला. तर ७० कोटी रुपयांच्या निधी उर्वरित ४५ हजार शेतकरी प्रतीक्षेत होते; पण यानंतर हा निधी शासनाने उपलब्ध करुन दिला. मात्र, काही धान खरेदी संस्थांनी हुंड्या जमा न केल्याने जिल्ह्यातील ८ हजार ४६० शेतकऱ्यांचा २० कोटी ४७ लाख १४ हजार रुपयांचा बोनस जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे थकला आहे.


शासनाने धान उत्पादकांना जाहीर केलेल्या बोनससाठी जिल्ह्यातील एकूण १ लाख ३५ हजार १३ शेतकरी पात्र ठरले होते. या शेतकऱ्यांना बोनस वाटप करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला एकूण २५८ कोटी ७० लाख रुपयांच्या निधीची गरज होती; पण शासनाने सुरुवातीला यासाठी १८३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यातून ९० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बोनसची रक्कम जमा करण्यात आली. तर ७० कोटी रुपयांच्या निधीअभावी ४५ हजार शेतकरी दीड महिन्यापासून प्रतीक्षेत होते. यानंतर आठ दिवसांपूर्वी शासनाने बोनससाठी ७० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून  दिला. ३६५४० शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा करण्यात आली. तर आठही तालुक्यांतील ८ हजार ४६० शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम अद्यापही जमा करण्यात आली नाही.


त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी विवेक इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी धान खरेदी करणाऱ्या काही संस्थांनी खरेदीच्या हुंड्या जमा केल्या नाही तर काहींनी त्या उशीरा जमा केल्या त्यामुळे ८ हजार ४६० शेतकऱ्यांचा खात्यावर २० कोटी ४७लाख १४ हजार रुपयांचा बोनस जमा झाला नाही. संस्थांकडून हुंड्या जमा होताच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा केली जाणार असल्याचे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. 


थकीत चुकाऱ्यांचे आले १३३ कोटी
रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे ३७५ कोटी रुपयांचे चुकारे गेल्या तीन महिन्यांपासून थकले आहेत. सोमवारी (दि. ११) शासनाने यासाठी १३३ कोटी रुपयांचा निधी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला उपलब्ध करून दिला. यातून १० जूनपर्यंत शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे चुकारे जमा केले जाणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Bonus of 8,460 farmers in Gondia district has been delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.