खुर्ची माझी प्रेमाची.. आमदार रमले संगीत खुर्चीत; व्हिडीओ झाला व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 18:39 IST2022-06-01T14:55:01+5:302022-06-01T18:39:20+5:30
एका कार्यक्रमादरम्यान संगीतखुर्चीचा खेळ खेळण्यात आला यावेळी आमदारमहोदयदेखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

खुर्ची माझी प्रेमाची.. आमदार रमले संगीत खुर्चीत; व्हिडीओ झाला व्हायरल
गोंदिया : खुर्चीचं प्रेम भल्याभल्यांना उड्या मारायला लावतं अस म्हणतात. राजकारणात एकमेकांची खुर्ची ओढण्याची स्पर्धा सुरुच असते. भाजप आमदाराचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून यात ते खुर्चीचा ताबा घेण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. एका कार्यक्रमादरम्यान संगीतखुर्चीचा खेळ खेळण्यात आला यावेळी आमदारमहोदयदेखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. आता खुर्चीचा खेळ म्हटल्यावर आमदार महोदय तरी मागे कसे राहणार? आमदारांनी मोठ्या उत्साहाने संगीतखुर्ची खेळात सहभाग नोंदवला. एक-एक करत सर्वांना मागे टाकत त्यांनी खुर्चीवर आपले स्थान पक्के केलेच.
मुलाच्या निधनानंतर खचले होते रहांगडाले
आमदार रहांगडाले यांचा एकुलता एक मुलगा आविष्कार रहांगडाले याचा जानेवारी महिन्यात अपघाती मृत्यू झाला होता.वर्धा जिल्ह्याच्या सेलसुरा येथे झालेल्या अपघातात सात वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना राज्यभर गाजली होती. एकुलत्या एक मुलाला गमावल्याने आमदार रहांगडाले संपूर्णत: खचून गेले होते. पण, त्या दु:खातून काहीसे सावरत ते पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत.