अंगणवाडी सेविका पदासाठी बीई, बीएड अहर्ताधारकांनी केले अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 17:08 IST2025-03-07T17:05:49+5:302025-03-07T17:08:15+5:30

८८ पदासाठी तब्बल १२३९ अर्ज : गुणांच्या आधारावर होणार थेट निवड, १८ मार्च लागणार पहिली निवड यादी

BE, BEd qualification holders applied for the post of Anganwadi worker | अंगणवाडी सेविका पदासाठी बीई, बीएड अहर्ताधारकांनी केले अर्ज

BE, BEd qualification holders applied for the post of Anganwadi worker

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
अलीकडे कुठल्याही विभागाची भरती असो त्यात शिक्षित बेरोजगारीचे दर्शन घडत आहे. अंगणवाडी सेविका पदासाठी बीई, बीएड, एम. ए. शैक्षणिक अर्हताधारकांनी तर मदतनीस पदासाठी पदवीधारक उमेदवारांनी अर्ज केले असल्याची बाब पुढे आली आहे. यावरून उच्च शिक्षित उमेदवारांची नोकरीच्या शोधात कशी धडपड सुरू याची वास्तविकता पुढे आली आहे.


जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रात ५२ अंगणवाडी सेविका व ३६ मदतनीस पदाची भरती प्रक्रिया महिला व बालविकास विभागाद्वारे सुरू आहे. या एकूण ८८ पदासाठी जिल्ह्यातून १२३९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदाकरिता किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक कागदपत्रांनुसार गुणांकन करण्यात येणार आहे. बारावीचे टक्केवारीनुसार कमाल गुण ६०, पदवीधर असल्यास १० गुण, पदव्युत्तर असल्यास ४ गुण, डी. एड. २ गुण, बी.एड २ गुण, संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असल्यास २ गुण देण्यात येतील. विधवा व अनाथ उमेदवारांना अतिरिक्त १० गुण देण्यात येणार.


अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती उमेदवारांना ५ गुण, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग उमेदवारास ३ गुण आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास ५ गुण दिले जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची मुदत संपली. आता अर्जाच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यात अर्ज केलेल्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता पाहून अधिकारी व कर्मचारीसुद्धा आश्चर्यचकित झाले. अंगणवाडी सेविका पदासाठी बीई, बीएड, डीएड, विधी पदवी, एम.ए, बी. एस्सी शैक्षणिक अर्हताधारकांनी अर्ज केले आहेत.


उमेदवारांनो भूलथापांना बळी पडू नका
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदाकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांशी संपर्क करून त्यांची निवड करून देण्याचे आमिष, भूलथापा देऊन त्यांची आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहे त्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडून आपली फसवणूक करून घेऊ नये. उमेदवारांनी याची खबरदारी घ्यावी.


दहा दिवसांत प्रसिद्ध होणार पहिली निवड यादी

  • याद्या संबंधित महसुली गावात प्रसिद्ध करून हरकती मागविल्या जातील. त्या हरकती १० दिवसांच्या कालावधीत प्रकल्प कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.
  • प्राप्त हरकतींचे निराकरण झाल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करून निवड झालेल्या पात्र उमेदवारांना नियुक्तिपत्रे दिले जाणार


तोंडी परीक्षा नाही थेट होणार निवड
सदर प्रक्रियेमध्ये शैक्षणिक कागदपत्रानुसारच गुणदान करण्यात येणार आहेत. गुणानुक्रमानुसार उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल. या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची तोंडी परीक्षा घेतली जाणार नाही.


अर्जाची पडताळणी करण्यासाठी समिती
अंगणवाडी सेविका, मदतनीस या पदासाठी प्राप्त झालेल्या एकूण १२३९ अर्जाची पडताळणी करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची गुणवत्ता पडताळणी समिती गठित करण्यात आली आहे.


"शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसारच अंतिम गुणवत्ता यादीतील गुणानुक्रमे पात्र उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणीच्या अधिन राहून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे."
-कीर्तिकुमार कटरे, महिला व बालविकास अधिकारी, जि. प. गोंदिया

Web Title: BE, BEd qualification holders applied for the post of Anganwadi worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.