गोंदियात ध्वजारोहणास छगन भुजबळांच्या नकाराने तर्कवितर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:50 IST2025-08-14T12:41:13+5:302025-08-14T12:50:53+5:30
पालकमंत्री नाराजी नाट्याची झळ पोहोचल्याची चर्चा : महायुतीत धुसफूस कायम

Arguments over Chhagan Bhujbal's refusal to hoist the flag in Gondia
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा पेच अद्यापही कायम आहे. तर गेल्या काही दिवसांपासून महायुतीत यावरून धुसफुस आणि वाद कायम आहे. याच वादाची झळ आता विदर्भातील गोंदिया जिल्ह्यालाही बसली आहे. राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनाला कोण कुठे ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली. गोंदियाला ध्वजारोहणाची जबाबदारी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आली होती. परंतु त्यांनी त्यास नकार दिल्याने आता मंत्री मंगलप्रसाद लोढा हे ध्वजारोहण करणार आहेत.
मंत्री छगन भुजबळ हे नाशिकचे असल्याने त्यांना तेथे ध्वजारोहण करण्याची इच्छा होती. पण तो मान भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आल्याने छगन भुजबळ नाराज असल्याचे बोलल्या जाते. एकूणच पालकमंत्री पदावरून महायुतीत मतभेद उफाळून आले असल्याचे चित्र आहे. गोंदिया जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचेच मंत्री बाबासाहेब पाटील आहेत. पण त्याची प्रकृती ठीक नसल्याचे समजते. त्यामुळे गोंदियाची जबाबदारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली होती. पण त्यांनी याला स्पष्टपणे नकार दिल्याची माहिती आहे.
नाशिकचा मान न मिळाल्यानेच गोंदियास नकार
२०२७ मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होत असल्याने नाशिक पालकमंत्रिपदासाठी तिन्ही पक्ष दावा करत आहे. राज्य सरकारकडून नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्याची जबाबदारी गिरीश महाजन यांना देण्यात आल्याने शिवसेना नेते दादा भुसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्याची संधी न मिळाल्याने मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याने त्यांनी गोंदियामध्ये ध्वजारोहण करण्यास नकार दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे.
महायुतीत ऑलबेल नाहीच
भुजबळ यांच्या नकारामुळे ते भाजप व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांवरही नाराज असल्याचे बोलल्या जाते. मुख्यमंत्र्यांनीही त्यांची समजूत न काढता त्यांच्या नकारानंतर तत्काळ निर्णय घेत ही जबाबदारी लोढा यांच्याकडे सोपवली. यावरून मुख्यमंत्री ज्येष्ठ मंत्र्यांच्या नाराजीला भीक घालत नसल्याचे स्पष्ट आहे. महायुतीतील घटक पक्ष शिवसेना शिंदे गट आधिच भाजपवर नाराज आहे. आता राष्ट्रवादीचीही वाटचाल त्याच दिशेने सुरू असल्याचे दिसून येते. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात भुजबळांनी नाराजी व्यक्त केल्याने महायुतीत ऑलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गोंदियाचे पालकमंत्रिपद चर्चेचा विषय
- गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नेहमीच चर्चेचा विषय आहे. अडीच वर्षांच्या कालावधीत पाच पालकमंत्री मिळाल्याचा इतिहास सुध्दा जिल्ह्याच्या नावावर आहे.
- माजी मंत्री राजकुमार बडोले वगळता आतापर्यंत जिल्ह्याला सर्व पालकमंत्री हे बाहेरीलच लाभले.
- जिल्हाबाहेरील पालकमंत्री असल्याने त्यांचे दर्शन किमान १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला तरी होईल अशी अपेक्षा जिल्हावासीयांनी होती पण ती सुध्दा फोल ठरली.