पत्नीशी वाद; रागाच्या भरात शिक्षकाची रेल्वेखाली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:56 IST2025-06-03T12:55:26+5:302025-06-03T12:56:06+5:30

आमगाव रेल्वेस्थानकावरील प्रकार : मृत शिक्षक मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यातील

Argument with wife; Teacher commits suicide under train in anger | पत्नीशी वाद; रागाच्या भरात शिक्षकाची रेल्वेखाली आत्महत्या

Argument with wife; Teacher commits suicide under train in anger

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
रागाच्या भरात घेतलेला निर्णय जिवावर बेतला. रविवारी (दि. १ जून) सायंकाळी आमगाव रेल्वेस्थानकावर पत्नीशी झालेल्या वादानंतर एका शिक्षकाने छत्तीसगड एक्स्प्रेससमोर उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने रेल्वेस्थानकावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तुलसीदास पराते (वय ३५, रा. विदिशा, मध्य प्रदेश) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.


विदिशा येथे शिक्षक म्हणून कार्यरत तुलसीदास पराते हे पत्नी आणि मुलीसह आमगावला लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्यातील कारंजा येथे आयोजित एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रम आटोपून ते रविवारी (दि. १) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरी परतण्यासाठी पत्नी आणि मुलीसह आमगाव स्टेशनवर पोहोचले. ते गावाला जाण्यासाठी छत्तीसगड एक्स्प्रेसची वाट पाहत होते. दरम्यान, कुठल्या तरी गोष्टीवरून पती पत्नीमध्ये भांडण सुरू झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात येऊन तुलसीदास यांनी अचानक प्लॅटफॉर्मवर आलेल्या छत्तीसगड एक्स्प्रेसच्या इंजिनसमोरच उडी मारून आत्महत्या केली. घटनेनंतर पत्नी आणि मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लोकांची गर्दी जमली. यामुळे आमगाव रेल्वेस्थानकावर काही वेळ गोंधळ उडाला होता. पतीने उचललेल्या पावलामुळे पत्नी व मुलीची अवस्था केविलवाणी झाली होती. रेल्वेस्थानकावरील या प्रसंगाने उपस्थित प्रवासी आणि रेल्वे विभागाचे कर्मचारीसुद्धा हळहळले.


रेल्वे पोलिसांनी केली घटनेची नोंद
या घटनेची माहिती मिळताच आमगाव रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन बिलासपूरहून गोंदिया मार्गे अमृतसरला जात होती. या कुटुंबाला या ट्रेनने प्रवास करायचा होता; पण नशिबात काहीतरी वेगळेच लिहिले होते. घटनास्थळी पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी आमगाव रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, तपास सुरू आहे.
 

Web Title: Argument with wife; Teacher commits suicide under train in anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.