नोकरीवरून काढल्याचा राग, गळ्यात जोड्यांची माळ टाकून व्हिडीओ केला व्हायरल
By नरेश रहिले | Updated: August 16, 2023 19:13 IST2023-08-16T19:13:38+5:302023-08-16T19:13:51+5:30
याप्रकरणी १५ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा राठी (२६), रा. गोंदिया असे आरोपीचे नाव आहे.

नोकरीवरून काढल्याचा राग, गळ्यात जोड्यांची माळ टाकून व्हिडीओ केला व्हायरल
गोंदिया : रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सहयोग हॉस्पिटल येथे अजय दिगंबरराव ठाकरे (४७), रा. नागपूर यांच्या गळ्यात आरोपीने नोकरीवरून काढल्याचा राग मनात ठेवून ९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता जोड्यांची माळ टाकून त्याचा व्हिडीओ तयार करून तो व्हायरल केला. याप्रकरणी १५ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा राठी (२६), रा. गोंदिया असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी कृष्णा राठी याला कंपनीतून काढण्यात आले. त्यामुळे अजय ठाकरे याच्यामुळे माझी नोकरी गेली, असा समज त्याचा झाल्याने याचा वचपा काढण्यासाठी अजय ठाकरे यांच्या गळ्यात जोड्यांची माळ टाकून त्याचा व्हिडीओ तयार केला. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. नोकरीवरून काढल्याचा राग मनात धरून हे कृत्य करण्यासाठी तो अजय ठाकरे यांचा पाठलाग करीत होता.
अजय ठाकरे हे गोंदियातील तीन मोठ्या हॉस्पिटल येथे गेले असताना त्या हॉस्पिटलच्या खाली आरोपी जोड्यांचा हार घेऊन तयारच होता. त्यांना शिवीगाळ करीत मारण्याची धमकी देत होता. अखेर ९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता सहयोग हॉस्पिटल येथे अजय ठाकरे यांच्या गळ्यात जोड्यांची माळ टाकण्याचा प्रयत्न केला. या कृत्याचा व्हिडीओ तयार करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला. तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी आरोपी कृष्णा राठी विरुद्ध भादंविच्या २९४, ३२३, ५००, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार बांते करीत आहेत.