गोंदिया-हैदराबादनंतर गोंदिया-इंदूर विमानसेवेचे टेकऑफ, सहा महिन्यांचे वेळापत्रक जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 13:14 IST2025-09-02T13:13:22+5:302025-09-02T13:14:08+5:30
१६ सप्टेंबरपासून होणार सेवेला प्रारंभ : या नव्या सेवेमुळे गोंदिया जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांतील प्रवाशांनाही लाभ मिळणार

After Gondia-Hyderabad, Gondia-Indore flight service takes off, six-month schedule announced
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळावरून सुरू झालेल्या गोंदिया-हैदराबाद-तिरुपती प्रवासी विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानंतर आता येत्या १६ सप्टेंबरपासून गोंदिया-इंदूर विमानसेवेला १६ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. या नव्या सेवेमुळे गोंदिया जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांतील प्रवाशांनाही लाभ मिळणार आहे.
गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळावर गेल्या वर्षापासून प्रवासी विमानसेवेला प्रारंभ झाला आहे. इंडिगो कंपनीने गोंदिया-हैदराबाद-तिरुपती या मार्गावर सुरू केलेल्या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, दररोज ७० ते ८० प्रवासी या विमानतळावरून ये-जा करीत आहेत. सध्या आठवड्यातून दोन दिवस गोंदिया-हैदराबाद-तिरुपती विमानसेवा सुरू आहे. यानंतर आता स्टार एअर या विमान कंपनीने बिरसी विमानतळावरून गोंदिया-इंदूर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विमानसेवेला १६ सप्टेंबरपासून सुरुवात केली जाणार आहे. याचे वेळापत्रकसुद्धा विमान कंपनीने जाहीर केले आहे. गोंदिया-इंदूर या मार्गावर आठवड्यातून मंगळवार, बुधवार व शुक्रवार हे तीन दिवस विमान सेवा सुरू राहणार आहे. बिरसी विमानतळावरून सायंकाळी ५ वाजता विमान इंदूरसाठी उड्डाण घेईल. ते इंदूर येथे सायंकाळी ५:५५ वाजता पोहोचेल, तर इंदूर येथून सायंकाळी ६:२५ वाजता गोंदियाकरिता उड्डाण घेईल व सायंकाळी ७:२० वाजता गोंदिया येथे पोहोचेल.
नाइट लँडिंगची सुविधा
तत्कालीन केंद्रीय विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ तयार करण्यात आले. त्यानंतर सुरुवातीला फ्लाय बिग या विमान कंपनीने गोंदिया-इंदूर मार्गावर प्रवासी विमानसेवेला सुरुवात केली होती. जून महिन्यात बिरसी विमानतळावरील नाइट लँडिंगची सुविधा पूर्ववत करण्यात आली. याला डीजीसीएची परवानगीसुद्धा मिळाली आहे.
विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी
स्टार एअर विमान कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिरसी विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यापूर्वी सोमवारी (दि.१) बिरसी येथे भेट देऊन विमानतळावर उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह चर्चा केली.