३६४ अंगणवाड्या मरणासन्न; काळजाच्या तुकड्यांचा जीव मुठीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 16:47 IST2024-11-05T16:45:46+5:302024-11-05T16:47:01+5:30
नादुरुस्त वर्गखोल्यांत ज्ञानार्जन : ९७ अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारतीच नाहीत

364 Anganwadis are at worst condition; The life of the children at risk
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील चिमुकल्यांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी अंगणवाडीत पाठविले जाते, परंतु स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ असलेल्या चिमुकल्यांना चक्क धोक्याच्या अंगणवाड्यांत पाठविले जाते. जिल्ह्यातील ३६४ अंगणवाड्या चिमुकल्यांसाठी धोकादायक आहेत.
जिल्ह्यातील आठही तालुक्यांत धोकादायक अंगणवाड्या आहेत. १७४ अंगणवाड्यांच्या इमारती जीर्ण तर १९० अंगणवाड्यांच्या इमारती अतिजीर्ण झाल्या आहेत. या नादुरुस्त अंगणवाड्यांमधून सध्याच्या स्थितीत जिल्ह्यातील हजारो चिमुकले शिक्षणाची गोडी लावण्यासाठी जात आहेत. अशा अंगणवाड्यांत मुलांना शिकायला पाठविणे धोकादायक आहे. जीव धोक्यात घालून चिमुकल्यांना अंगणवाड्यांत जावे लागत आहेत. मात्र, आपल्या मुलांना अशा अंगणवाड्यांत पाठविताना पालक चिंतित आहेत.
धोकादायक अंगणवाड्यांमध्ये मुलांना पाठविणे आई-वडिलांना धोक्याचे वाटत आहे. अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. या अंगणवाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट जिल्हा परिषदेकडून केले जात नसून फक्त अंगणवाड्या धोकादायक असल्यास याबाबत अहवाल दिला जातो.
९७ अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत
गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यांची परिस्थिती पाहता, ९७ अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नसल्याने स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही चिमुकल्यांसाठी अंगणवाडीची सोय करण्यात शासन अपयशी ठरले आहे. गोंदिया-१ अंतर्गत ११, गोंदिया-२ अंतर्गत २, अर्जुनी- मोरगाव ८, गोरेगाव ७, देवरी १४, सालेकसा ३, सडक-अर्जुनी १८, तिरोडा ३१, आमगाव ३ अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती नाहीत.
जिल्ह्यातील जीर्ण व अतिजीर्ण इमारती प्रकल्पनिहाय
प्रकल्प जीर्ण अजीर्ण
गोंदिया-१ २९ १८
गोंदिया-२ ०३ २४
अर्जुनी-मोरगाव ४२ २३
गोरेगाव १२ २३
देवरी १४ १४
सालेकसा ०८ ३७
सडक - अर्जुनी २८ १७
तिरोडा २१ २२
आमगाव १७ १२
एकूण १७४ १९०