मतदारांचा कौल कुणाला? प्रयत्न जोरदार; मात्र यश कुणाच्या पारड्यात हे जनताच ठरवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2024 06:52 IST2024-03-29T06:51:22+5:302024-03-29T06:52:18+5:30
यंदा भाजपला 'अच्छे दिन' येणार का? की काँग्रेसचा उमेदवार बाजी मारणार, याची उत्सुकता आहे.

मतदारांचा कौल कुणाला? प्रयत्न जोरदार; मात्र यश कुणाच्या पारड्यात हे जनताच ठरवणार
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : दक्षिण गोव्यातील मुरगाव तालुका लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांत तालुक्यातील चारही मतदारसंघांतून भाजपने मतदानाची टक्केवारी वाढवलेली आहे. तीन मतदारसंघांत भाजपचे आमदार असून, चौथ्यातील अपक्ष आमदाराचा पाठिंबा भाजपला असल्याने सध्या वारे चांगले असल्याचा दावा केला जातो. त्यात काँग्रेसनेही आपले जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मुरगाव तालुक्यात भाजप आघाडी घेणार की काँग्रेस वा इतर पक्षांचे उमेदवार मते आपल्याकडे वळवणार, हे नंतरच स्पष्ट होईल.
मुरगाव तालुक्यात कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को आणि मुरगाव हे चार मतदारसंघ, भाजपने दक्षिण गोव्यातून पल्लवी धेपे यांना उमेदवारी घोषित केली आहे. काँग्रेसने अजून उमेदवार घोषित केलेला नाही.
गेल्या तीन लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी पाहिल्यास तालुक्यातील चारही मतदारसंघांतून भाजपने मतांची टक्केवारी वाढवल्याचेच दिसून आले आहे. २०२२च्या विधानसभा निवडणुकीत मुरगाव तालुक्यातील दोन मतदारसंघांतून भाजप उमेदवार तर एका मतदारसंघातून काँग्रेस आणि एका मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विजयी झाला. मुरगावमधून निवडून आलेले संकल्प आमोणकर यांनी काँग्रेसमधून काही महिन्यांतच भाजप प्रवेश केला. कुठ्ठाळी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अँथनी वास यांनी विजयी झाल्यानंतर लगेच भाजप सरकारला पाठिंबा दिला.
वास्कोतून कृष्णा साळकर आणि दाबोळीतून माविन गुदिन्हो या भाजप उमेदवारांचाच विजय झाला होता. सद्य:स्थितीत चारही मतदारसंघांवर भाजपचेच वर्चस्व असल्याचे जाणवते. काँग्रेसच्या तिकिटांवर निवडून आलेल्या संकल्प यांनी भाजप प्रवेश केला असला तरी त्यांना मतदान करणारे काँग्रेसचे मतदार लोकसभा निवडणुकीसाठी संकल्पबरोबर राहणार की नाहीत? याचे उत्तर नंतरच स्पष्ट होईल.
कुठ्ठाळीतून अॅथनी वास यांना लोकांनी अपक्ष म्हणून निवडून दिले. त्यांचा भाजपला पाठिंबा असला तरी मतदार कोणाच्या बाजूने उभे राहणार, हाही प्रश्नच आहे. यंदा भाजपला 'अच्छे दिन' येणार का? की काँग्रेसचा उमेदवार बाजी मारणार, याची उत्सुकता आहे.