स्मार्ट सिटीच्या कामामुळे मतदान टक्केवारीला फटका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2024 11:32 AM2024-05-09T11:32:45+5:302024-05-09T11:33:57+5:30

फोडलेल्या रस्त्यांमुळे घराबाहेर पडणेही कठीण; ज्येष्ठांसाठी त्रासदायक

voter turnout affected by smart city work in panaji for goa lok sabha election 2024 | स्मार्ट सिटीच्या कामामुळे मतदान टक्केवारीला फटका?

स्मार्ट सिटीच्या कामामुळे मतदान टक्केवारीला फटका?

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात ७६ टक्के मतदान झाले. राजधानीत मात्र अन्य मतदारसंघांच्या तुलनेत कमी मतदान झाले. शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी कामांचा फटका पणजीतील मतदानावर झाल्याचे म्हटले जात आहे. या कामांमुळे मतदारांनी घरातून बाहेर पडण्यास फारशी उत्सुकता दाखवली नसल्याचा अंदाज आहे.

निवडणुकीत पणजीवगळता बहुतेक मतदारसंघांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. पणजीत मात्र दुपारपर्यंत ६० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. त्यामुळे संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हा आकडा ७० टक्क्यांच्या पार जाईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात ६७ टक्केच मतदान झाले. त्यामुळे या सर्वांचा संबंध शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी कामांशी जोडला जात आहे. शहरात अनेक ठिकाणी ही खोदकामामुळे रस्ते वाहतुकीसाठी बंद असून, ती अन्य मार्गावरून वळवली जात आहे.

पणजी विधानसभा मतदारसंघात ३० मतदान केंद्रे आहेत. या केंद्र परिसरातही स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. मात्र, ती वेळेत पूर्ण व्हावीत असे निर्देश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार स्मार्ट सिटीने मतदान केंद्र असलेल्या परिसरातील कामे पूर्ण केली. मात्र रहिवासी परिसरातील खोदलेले रस्ते जैसे थेच ठेवले. त्यामुळे विशेषकरून ज्येष्ठ नागरिकांना घरातून निघणे अडचणीने ठरल्याचे म्हटले जात आहे. पणजीत एकूण मतदारांची संख्या २२ हजार आहे.

लोकांच्या घरासमोरील रस्तेच स्मार्ट सिटी कामाच्या नावाखाली फोडल्याने मतदारांना मतदानासाठी जाताना बरीच कसरत करावी लागली. त्यामुळे बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाला जाण्याचे टाळले. मतदान केंद्र परिसरातील रस्त्यांचे काम स्मार्ट सिटीने पूर्ण केले. मात्र, लोकांच्या घर, इमारती समोरच जर रस्ते फोडले असतील तर त्यांनी बाहेर कसे निघावे ? याचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर झाला. - उदय मडकईकर, नगरसेवक, पणजी मनपा.

लोकसभा निवडणुकीसाठी सरासरी पणजीत जितके मतदान होते, त्यापेक्षा किंचित कमी मतदान झाले आहे. पणजीत साधारणतः ७० टक्के मतदान होते. त्यात केवळ ६७ टक्के मतदान म्हणजे ३ टक्क्यांचा फरक पडला आहे. मतदान कमी झाले याचा स्मार्ट सिटी कामांशी संबंध जोडणे योग्य नाही. स्मार्ट सिटी कामांचा फटका मतदानावर झाला, असे म्हणणे योग्य नाही. - शेखर डेगवेकर, माजी नगरसेवक, पणजी मनपा.

 

Web Title: voter turnout affected by smart city work in panaji for goa lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.