नरेंद्र मोदींच्या सभेला पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती लाभणार, सदानंद शेट तानावडे यांचा दावा
By किशोर कुबल | Updated: April 24, 2024 16:12 IST2024-04-24T16:11:48+5:302024-04-24T16:12:19+5:30
Lok Sabha Election 2024 : तानावडे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचा भाजपचा प्रचार बऱ्या तऱ्हेने पुढे जात आहे.

नरेंद्र मोदींच्या सभेला पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती लाभणार, सदानंद शेट तानावडे यांचा दावा
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या २७ रोजी सांकवाळ येथे होणार असलेल्या जाहीर सभेला पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती लाभणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, ' मोदींच्या सभेची तयारी जोरात सुरू आहे. मुरगांव तालुक्यातील भाजप आमदार दाजी साळकर, संकल्प आमोणकर, वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो व कुठ्ठाळीचे अपक्ष आमदार आंतोन वास हे विशेष जबाबदारी घेऊन सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पन्नास हजार पेक्षा जास्त लोक सभेला येतील, अशी आमची खात्री आहे.
तानावडे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचा भाजपचा प्रचार बऱ्या तऱ्हेने पुढे जात आहे. घरोघर प्रचार सुरू झालेला आहे.
दरम्यान, भारतीय रिपब्लिकन पार्टीने (आठवले गट) भाजप उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला असून पक्षाचे गोवा प्रभारी बाळासाहेब बनसोडे यांनी पाठिंब्याचे पत्र तानवडे यांच्याकडे सुपूर्द केले.
प्रदेश भाजपचा जाहीरनामा २९ रोजी
प्रदेश भाजप आपला जाहीरनामा येत्या २९ रोजी जाहीर करणार असल्याचे तानावडे एका प्रश्नावर म्हणाले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर त्यांनी जोरदार टीका केली. सावंत सरकारने ज्या गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत त्याबद्दलची आश्वासने काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसतात, असे तानावडे म्हणाले. पत्रकार परिषदेस आमदार संकल्प आमोणकर व आमदार दाजी साळकर हेही उपस्थित होते.