दक्षिणेच्या तिकिटावरून भाजपचे तळ्यात मळ्यात; पल्लवी धेंपे की नरेंद्र सावईकर उमेदवारी कोणाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2024 10:28 IST2024-03-21T10:24:34+5:302024-03-21T10:28:16+5:30
उद्या ठरणार

दक्षिणेच्या तिकिटावरून भाजपचे तळ्यात मळ्यात; पल्लवी धेंपे की नरेंद्र सावईकर उमेदवारी कोणाला?
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दक्षिण गोव्याची उमेदवारी कोणाला द्यायची यावरुन भाजपचे अजनुही तळ्यात मळ्यात सुरू आहे. तर दुसरीकडे या तिकिटासाठी पल्लवी धंपे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या नावाला भाजपश्रेष्ठी अनुकुल आहेत पण अजुनही धेपे की नरेंद्र सावईकर यांना तिकीट मिळेल याचे नीट उत्तर भाजपच्या स्थानिक नेत्यांनाही हायकमांडकडून मिळत नाही.
'लोकमत' ला प्राप्त महितीनुसार, धंपे उद्योग समुहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेपे यांच्या पत्नी पल्लवी यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. धंपे कुटूंब भाजप समर्थक आहे. अधिकृतरित्या तिकीट जाहीर झाल्यानंतरच पल्लवी भाजप कार्यालयास भेट देतील, असे सूत्रांनी सांगितले. मात्र पक्षातील एका गटाने काल असेही स्पष्ट केले की पल्लवी की नरेंद्र सावईकर यांना तिकीट द्यावे याचा फैसला उद्या शुक्रवारीच होणार आहे.
लोकसभेसाठी गोव्यातील मतदान तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच ७ मे रोजी होणार आहे. त्यामुळे उमेदवार जाहीर करण्यास पक्षाकडून काहिसा विलंब होत आहे. परंतु पुढील दोन दिवसात उमेदवार घोषित होतील. अखेरच्या क्षणी महिलेऐवजी पुरुषाला तिकीट द्यावी, असे ठरले तर माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर यांच्या नावाची चर्चा आहे.
काँग्रेस उमेदवार देऊच शकणार नाही
भाजपचे गोवा प्रभारी आशिष सूद म्हणाले की, सूत्रांकडून मला मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस उमेदवार देऊच शकणार नाही, कारण त्यांना उमेदवारच सापडत नाहीय. दक्षिण गोव्यात भाजप असा उमेदवार निवडणार आहे की, जो मोदीजींच्या
विकसित भारताचे स्वप्न पुढे नेईल.
जुझे काँग्रेसवर नाराज
दुसरीकडे राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी काँग्रेस उमेदवार देण्यास विलंब लावत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, इंडिया अलायन्स युतीसाठी काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी विरोधी पक्षांची बैठक घेतली, परंतु त्यानंतर पुढे काहीच झालेले नाही. उमेदवार देण्याच्या बाबतीत काँग्रेसची अतिशय संथ गती आहे.