सार्दिन म्हणाले, आता मी आराम करणार! सध्या तरी निवडणूक लढवण्याची इच्छा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2024 08:24 IST2024-04-09T08:23:07+5:302024-04-09T08:24:16+5:30
पक्षाचे उमेदवार कॅप्टन विरीयातो फर्नाडिस यांच्यासाठी काम करणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

सार्दिन म्हणाले, आता मी आराम करणार! सध्या तरी निवडणूक लढवण्याची इच्छा नाही
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने तिकीट नाकारलेले विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी आपण आता आराम करणार असल्याचे असे स्पष्ट केले आहे. तसेच सध्या निवडणूक लढवण्याची आपली इच्छा नसल्याचे सांगितले.
प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, दहा वेळा मी निवडून आलो आहे. चारवेळा खासदार झालो. विधानसभेतही मुख्यमंत्रीही बनलो. विद्यमान खासदार म्हणून तिकिटाची मला अपेक्षा होती. परंतु पक्षाने माझा पत्ता कापल्याने मी दुःखी नव्हे, पण निराश झालेलो आहे. पक्षाने तिकीट नाकारल्याचे कळताच मी माझ्या कार्यकर्त्यांना राजकारणापासून तूर्त दूर होत असल्याचे सांगितले. तसेच समाजकार्य मात्र चालूच ठेवणार असल्याचाही संदेश दिला आहे. अनेकांनी मला तुम्ही ही निवडणूक लढवाच, असा आग्रह धरला. परंतु मला निवडणूक लढवायची नाही. मी आराम करणार, असे सार्दिन म्हणाले.
पक्षात नव्यानेच आलेल्या काहीजणांना मी नको होतो. खरे तर काँग्रेस जुन्या नेत्यांनीच जिवंत ठेवली. १९७७ पर्यंत गोव्यात काँग्रेस तशी अस्तित्वात नव्हती. परंतु मी, प्रतापसिंह राणे, बाबू नायक, डॉ. विली डिसोझा, एदुआर्द फालेरो अशा आम्ही सर्वांनी काँग्रेसला चांगले दिवस आणले. २०१४ साली काँग्रेसने रेजिनाल्ड यांना तिकीट दिले तेव्हा त्यांचा ३२ हजार मतांनी पराभव झाला. विजय सरदेसाई यांनी फातोड्र्ध्यात रेजिनाल्डसाठी काम करूनही तिथे ९,६०० मते मिळाली. २०१९ च्या निवडणुकीत सरदेसाई यांनी माझ्यासाठी काहीच काम केले नसताना फातोड्र्ध्यात मला १०,९६० मते मिळाली अशी आठवणही त्यांनी करून दिली.
उत्तर टाळले...
काँग्रेसने दिलेला उमेदवार निवडून येईल का?, या प्रश्नावर सार्दिन म्हणाले की, अनेकजण म्हणतात की त्याला संधी नाही. काहीजण निवडून येईल, असेही सांगतात. परंतु प्रत्यक्षात निकाल लागल्यावरच काय ते स्पष्ट होईल. उमेदवार मला भेटायला आला तर त्याचे अभिनंदन मी करीन.
निवडणुकीत काम करतील का?
मी आज-कालचा नेता नव्हे. लोक मला चांगले ओळखतात. या राज्याचा मी मुख्यमंत्री होतो. मी अजूनही लोकांशी कनेक्टेड आहे. लोक आग्रह करतात की, पक्षाने तिकीट नाकारली तरी मी रिंगणात उतरावे. परंतु सध्या तरी माझी तशी इच्छा नाही. भविष्यात काय ते पाहू. दुखावलेले सार्दिन या निवडणुकीत सक्रिय राहणार नाहीत. तसेच पक्षाचे उमेदवार कॅप्टन विरीयातो फर्नाडिस यांच्यासाठी काम करणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.