भाजपकडून जुळवाजुळव; लक्ष्मीकांत पार्सेकर, मिलिंद नाईक यांच्यासह अनेकांची घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2024 01:59 PM2024-05-02T13:59:38+5:302024-05-02T14:01:18+5:30

माजी मंत्री, माजी आमदार तसेच नाराज पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी

bjp met many people including milind naik for goa lok sabha election 2024 | भाजपकडून जुळवाजुळव; लक्ष्मीकांत पार्सेकर, मिलिंद नाईक यांच्यासह अनेकांची घेतली भेट

भाजपकडून जुळवाजुळव; लक्ष्मीकांत पार्सेकर, मिलिंद नाईक यांच्यासह अनेकांची घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: लोकसभेची निवडणूक अखेरच्या टप्प्यात आली असताना मताधिक्क्य गाठण्याच्या बाबतीत कोणतीही कसूर राहू नये याची खबरदारी घेत भाजपने पक्षापासून दुरावलेले माजी मंत्री, माजी आमदार तसेच नाराज पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन जुळवाजुळव सुरू केली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल स्वतः मुरगावचे माजी आमदार तथा माजी वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्या घरी पोचले. भाजपने दक्षिण गोवा मतदारसंघासाठी दिलेल्या उमेदवार पल्लवी धंपे यांच्यासाठी काम करण्याचे आश्वासन त्यांनी मिलिंद यांच्याकडून घेतले. मिलिंद हे मुरगाव तालुक्यात एवढे दिवस प्रचारात कुठेच दिसत नसल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. मुख्यमंत्री खास भेटण्यासाठी घरी आल्याने मिलिंद यांनीही त्यांना आपण भाजप उमेदवारासोबतच आहे त्याबद्दल किंतु बाळगू नका, असे सांगून आश्वस्त केले.

संकल्प आमोणकर यांना भाजपप्रवेश दिल्याने मिलिंद नाराज होते. आपल्याला साइटलाटन केले जात असल्याची त्यांची भावना बनली होती. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. सावर्डेत माजी आमदार तथा पूर्व बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांचे समर्थनही भाजपने मिळवले आहे. पाऊसकर हे भाजपप्रवेशाच्या उंबरठ्यावर आहेत. २०२२ ची विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. परंतु आता ते जवळजवळ भाजपवासी झाल्यातच जमा आहेत.

दुसरीकडे उत्तर गोव्यात प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची घरी जाऊन भेट घेतली. एनडीएचे उत्तरेचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्यासाठी काम करावे, अशी विनंती त्यांनी पार्सेकर यांना केली आहे. परंतु माजी मुख्यमंत्र्यांनी तानावडे यांना अद्याप कोणतेही आश्वासन दिलेले नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत पार्सेकर यांना भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी बंड करुन अपक्ष उमेदवारी भरली परंतु तींत त्यांचा पराभव झाला. पार्सेकर व श्रीपाद हे चांगले मित्र आहेत त्यामुळे ते कोणती भूमिक घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

पुन्हा संकल्पलाच तिकीट : मुख्यमंत्री

मुरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी संकल्प आमोणकर यांनी आमदार झाल्यानंतर काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत भाजपमध्ये प्रवेश केला. भविष्यातही या मतदारसंघाचा चौफेर विकास होणार आहे. त्यासाठी पुढील विधानसभा निवडणुकीत संकल्प हेच भाजपचे उमेदवार असणार आहेत, अशी घोषणाच काल, बुधवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बायणा- वास्को येथील जाहीर सभेत केली. दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेपे यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 

Web Title: bjp met many people including milind naik for goa lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.