नावातील साम्यामुळे दुसऱ्यानेच केले मतदान, गडचिराेलीच्या मतदान केंद्रावरची घटना
By दिगांबर जवादे | Updated: April 19, 2024 16:54 IST2024-04-19T16:48:10+5:302024-04-19T16:54:22+5:30
बूथ क्रमांक १०२ वर फुले वाॅर्डातील भारती रमेश गेडाम यांचे १०० अनुक्रमांकावर मतदार यादीत नाव आहे. याच वाॅर्डात भारती गेडाम या दुसऱ्या महिला आहेत.

नावातील साम्यामुळे दुसऱ्यानेच केले मतदान, गडचिराेलीच्या मतदान केंद्रावरची घटना
गडचिराेली : शहरातील नेहरू वाॅर्डातील महात्मा गांधी नगर परिषद शाळेच्या आवारात असलेल्या बूथ क्रमांक १०२ वर जवळपास समान नाव असलेल्या दुसऱ्या महिलेने मतदान केले. त्यामुळे मूळ मतदाराने यावर आक्षेप घेतल्याने केंद्रात काही काळ चांगलाच गाेंधळ उडाला हाेता. अखेर मतदान केंद्राध्यक्षांनी सदर मतदाराला मतदान करू दिल्यानंतर वातावरण शांत झाले.
बूथ क्रमांक १०२ वर फुले वाॅर्डातील भारती रमेश गेडाम यांचे १०० अनुक्रमांकावर मतदार यादीत नाव आहे. याच वाॅर्डात भारती गेडाम या दुसऱ्या महिला आहेत. दाेघींचे पहिले व शेवटचे नाव सारखे असले तरी मधले नाव वेगळे आहे. दुसऱ्या भारती गेडामचे नाव दुसऱ्या बूथवर असावे. मात्र याची फारशी शहानिशा न करता ती बूथ क्रमांक १०२ वर पाेहाेचली. मतदान अधिकाऱ्यांनी निवडणूक ओळखपत्र, यादीतील नाव, वय, फाेटाे याची शहानिशा न करताच तिला मतदान करू दिले.
काही वेळानंतर भारती रमेश गेडाम या मतदान करण्यासाठी पाेहाेचल्या. त्यावेळी त्यांच्या नावासमाेर सही झाली असल्याने त्यांनी मतदान केले, असे मतदान केंद्राध्यक्षांनी सांगितले. मात्र आपण मतदान केले नसल्याचे सांगून भारती रमेश गेडाम यांनी आक्षेप घेतला. आपण मतदान केल्याशिवाय परत जाणार नाही, असा इशारा भारती गेडाम यांनी मतदान केंद्राध्यक्षांना दिला. त्यामुळे काही काळ मतदान केंद्रावर चांगलाच गाेंधळ उडाला हाेता. केंद्राध्यक्षांनी झालेली चूक मान्य केली. भारती रमेश गेडाम हिला मतदान करू दिले. मात्र आता एकाच मतदाराच्या नावाने दाेन मतदान झाले आहेत. पूर्वी केलेले मतदान रद्द करावे लागणार आहे.
याबाबत मतदान केंद्राध्यक्षांना विचारले असता, भारती गेडाम हे नाव सारखे असल्याने लक्षात आले नाही. दाेघींचे मधले नाव, वय, फाेटाे यांची शहानिशा करण्यात आली नाही. त्यामुळे चूक झाल्याची बाब ‘लाेकमत’शी बाेलताना मान्य केली.