महायुतीकडून धर्मरावबाबांनाच उमेदवारी, अम्ब्रीशरावांना शह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 15:58 IST2024-10-24T15:56:28+5:302024-10-24T15:58:00+5:30
अखेर पेच सुटला : राजपरिवारातील लढतीची उत्कंठा वाढली

Mahayuti only nominated Dharmarao Baba, not Ambrishrao
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने पहिल्या यादीत अहेरी मतदारसंघातून अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी जाहीर केल्याने या जागेवरुन सुरु असलेल्या दावे- प्रतिदाव्यांना पूर्णविराम मिळाला आहे. माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम हे महायुतीकडून लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, अजित पवार यांनी ही जागा आपल्याच कोट्यात ठेवून धर्मरावबाबा आत्राम यांना ताकद दिली आहे.
राजकीयदृष्ट्या अहेरी मतदारसंघ अतिशय प्रतिष्ठेचा आहे. महायुतीत या जागेचा तिढा अखेर सुटला असून धर्मरावबाबा यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांचे पुतणे व माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचा दावा संपुष्टात आला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंत्री आत्राम समर्थकांनी जल्लोष केला, तर अम्ब्रीशराव समर्थकांत सन्नाटा पसरला आहे. एकप्रकारे महायुतीत उमेदवारी मिळवून धर्मरावबाबांनी अम्ब्रीशराव यांना शह दिल्याचे मानले जात आहे.
बालेकिल्ला अबाधित राखण्याचे आव्हान
धर्मरावबाबा आत्राम यांचा राजकीय प्रवास सरपंच ते कॅबिनेट मंत्री असा थक्क करणारा आहे. १९८० मध्ये त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. सरपंच, जि. प. सदस्य, पंचायत समिती सभापती व नंतर ते विधानसभेच्या मैदानात उतरले.
ज्या-ज्यावेळी ते आमदार झाले तेव्हा तेव्हा मंत्री झाले तसेच गडचिरोली जिल्ह्यातील पहिले कॅबिनेट मंत्रीपदही त्यांनीच भूषविले त्यामुळे बालेकिल्ला अबाधित राखण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.
सातवेळा मैदानात, चारवेळा विजय
वर्ष विजयी / पराभूत
१९९० विजयी
१९९५ पराभूत
१९९९ विजयी
२००४ विजयी
२००९ पराभूत
२०१४ पराभूत
२०१९ विजयी
भाग्यश्री आत्रामांचे काय ?
महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. वडिलांच्या विरोधात बंड करून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या भाग्यश्री आत्राम यांच्या गोटात अस्वस्थता आहे. ही जागा कोणाला सुटणार आणि उमेदवारी कोणाला मिळणार, भाग्यश्री यांची वाटचाल कशी राहणार, याबाबत संभ्रम कायम आहे.
अम्ब्रीशराव यांचे तळ्यात मळ्यात
- उमेदवारी धोक्यात असल्याची कुणकुण लागल्यावर अम्ब्रीशराव आत्राम यांनी तातडीने मुंबई गाठली. नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
- भाजपकडून उमेदवारीची आशा मावळल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट तसेच काँग्रेसशीही बोलणी करीत आहेत. सध्यातरी त्यांची राजकीय दिशा अस्पष्ट आहे.
- मात्र, २४ ऑक्टोबरला ते नामांकन दाखल करणार असल्याच्या पोस्ट समर्थकांनी समाजमाध्यमात टाकल्या आहेत.