आठ उमेदवार कोट्यवधींचे धनी, 'दक्षिण'मध्ये सर्वाधिक श्रीमंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 14:00 IST2024-11-09T13:50:09+5:302024-11-09T14:00:24+5:30
नामांकनातून माहिती समोर : गडचिरोलीत एकही नाही कोट्यधीश

Eight candidates are rich in crores, the richest in 'south'
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी तीन मतदारसंघात २९ उमेदवार नशीब आजमावत आहेत. या उमेदवारांनी नामांकनासोबत जाहीर केलेल्या मालमत्तेच्या तपशीलानुसार तब्बल आठ उमेदवार कोट्यवधींचे धनी आहेत. यात दक्षिण गडचिरोलीतीलअहेरी मतदारसंघात सर्वाधिक पाच उमेदवारांचा समावेश असून आरमोरीतील तिघांच्या संपत्तीचे आकडेही कोटीच्या घरात आहेत.
शेवटच्या टोकावरील आदिवासीबहुल व मागास म्हणविणाऱ्या गडचिरोलीतील प्रमुख उमेदवारांच्या श्रीमंतीची यानिमित्ताने सर्वत्र चर्चा आहे. दक्षिण गडचिरोलीतील अहेरीत आत्राम राजपरिवाराचा गेली अनेक वर्षांपासून दबदबा आहे. अहेरी इस्टेटचाही परिसरात वेगळा रुतबा आहे. तीनवेळा राज्यमंत्री राहिलेले धर्मरावबाबा सध्या कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र, २०१९ च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत सहा कोटी रुपयांची घट झाल्याचे त्यांनी जाहीर केलेल्या घोषणापत्रात दिसत आहे. त्यांचे पुतणे व अपक्ष उमेदवार अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मालमत्तेत ५० लाखांहून अधिक वाढ झाली आहे.
आरमोरीचे माजी आमदार व काँग्रेसमध्ये बंडखोरी करुन अपक्ष मैदानात उतरलेले माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या संपत्तीतही पाच वर्षांत २७ लाखांची वाढ आहे. आरमोरीचे आमदार व महायुतीचे उमेदवार कृष्णा गजबे यांच्या संपत्तीत पाच वर्षांत ३८ लाख ५० हजारांची भर पडली आहे.
गडचिरोलीत 'वंचित'च्या येरमेंची संपत्ती नरोटे, पोरेटींपेक्षा अधिक
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे हे ३९ लाख २३ हजार रुपयांच्या संपत्तीचे धनी आहेत, महाविकास आघाडीचे उमेवादार मनोहर पोरेटी यांची संपत्ती ३८ लाख ३० हजार आहे. या दोहोंपेक्षा काँग्रेसमध्ये बंडखोरी करुन अपक्ष म्हणून मैदानात आलेल्या डॉ. सोनल कोवेंची संपत्ती अधिक आहे. त्यांच्याकडे ४६ लाख २९ हजार रुपयांची संपत्ती आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भरत येरमे हे संपत्तीच्या बाबतीत सर्वांत वजनदार आहेत. त्यांच्याकडे ५० लाखांची मालमत्ता आहे
कोणाची किती संपत्ती ?
धर्मरावबाबा आत्राम (महायुती) ३ कोटी ७१ लाख ५ हजार
भाग्यश्री आत्राम (मविआ) ६ कोटी ५८ लाख ५ हजार
अम्ब्रीशराव आत्राम (अपक्ष) ९ कोटी २७ लाख ७२ हजार
दीपक आत्राम (अपक्ष) १ कोटी १७ लाख ८० हजार
हनमंतु मडावी (अपक्ष) १ कोटी २ लाख ७५ हजार
आनंदराव गेडाम (अपक्ष) १ कोटी ६४ लाख ७८ हजार
डॉ. शिलू चिमूरकर (अपक्ष) ४ कोटी ५ लाख
रामदास मसराम (मविआ) २ कोटी ५० लाख ६० हजार