मला कशाचा फरक पडत नाही ! तन्मय भट प्रकरणी लतादिदींनी सोडलं मौन
By Admin | Updated: June 4, 2016 20:34 IST2016-06-04T20:32:11+5:302016-06-04T20:34:40+5:30
एआयबी रोस्टचा विनोदवीर तन्मय भटने केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजी विरोधात अखेर ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी मौन सोडत आपलं मत मांडलं आहे

मला कशाचा फरक पडत नाही ! तन्मय भट प्रकरणी लतादिदींनी सोडलं मौन
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 04 - एआयबी रोस्टचा विनोदवीर तन्मय भटने केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजी विरोधात अखेर ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी मौन सोडत आपलं मत मांडलं आहे. याअगोदर त्यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळत कोण तन्मय भट ? मी त्याला ओळखत नाही असं म्हणत त्याची जागा दाखवून दिली होती.
'मी अनेक संकटांमधून पुढे आले आहे, आयुष्यात मी अनेक अडचणींचा सामना केला आहे. त्यामुळे मला कशाचाच फरक पडत नाही. ज्या वयात इतर मुली खेळण्यात व्यस्त असायच्या मी गायक म्हणून नोकरी शोधत बाहेर फिरत होते. फक्त काम महत्वाचं असत हे मी खुप तरुण वयात शिकले. लोक खुप अस्वस्थ झाले आहेत, याचं मला खुप वाईट वाटलं. माझ्यामुळे कोणी अस्वस्थ झाल्याचं मला आवडत नाही. माझ्या प्रशंसकांना मी सांगू इच्छिते या सर्व खुप छोट्या गोष्टी आहेत. आयुष्यात यापेक्षा मोठे प्रश्न आहे. या गोष्टांना आपण जास्त महत्व नाही दिलं पाहिजे. असं करण्यामागे त्यांचीही काही कारणे असतील', असं मत लता मंगेशकर यांनी व्यक्त केलं आहे.
एआयबी कॉमेडी मास्टर तन्मय भट्टनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा अपमान करणारा वादग्रस्त व्हिडीओ स्नॅपचॅट आणि फेसबुकवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तन्मयनं अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरांवर टीका केली होती. या वादग्रस्त व्हिडीओमध्ये सचिन आणि लता मंगेशकर यांच्या शाब्दिक चकमक झडल्याचं दाखवण्यात आलं होतं, त्यात अश्लील शब्दांचा वापर करण्यात आला होता. या व्हिडीओवरून तन्मय भट्ट याच्यावर चहूबाजूंनी टीका झाली होती. अनेक बॉलिवूडकरांनी हा व्हिडीओ विनोदी नसून, वादग्रस्त असल्याचं म्हटलं होतं.
या आधीही एआयबीनं अभिनेता रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि चित्रपट निर्माता करण जोअर यांच्याबाबत शिवीगाळ केल्याचं दाखवलं होतं. त्याप्रकरणी एआयबीविरोधात एफआयआर दाखल झाला होता. या व्हिडीओमध्ये तन्मयनं ज्येष्ठ गायिका लता मंगेशकरांना 'जॉन स्नोही मेला मग तुम्ही कधी मरणार आहात. तुमचा चेहरा आठ दिवस पाण्यात ठेवल्यासारखा दिसतो आहे', असे प्रश्न विचारून अत्यंत हीन भाषेत टीका केली होती. व्हिडीओवर अनुपम खेर, रितेश देशमुख, सेलिना जेटली आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनीही सडकून टीका केली होती.