पाणी चांगलंच पेटलंय!

By Admin | Published: October 3, 2015 01:41 AM2015-10-03T01:41:00+5:302015-10-03T01:41:00+5:30

काही चित्रपट अनपेक्षित असा धक्का देऊन जातात आणि असाच एक धक्का मुंगळा या चित्रपटाने दिला आहे. अस्सल ग्रामीण बाजाचा हा चित्रपट दुष्काळी पार्श्वभूमी निवडत

The water is so good! | पाणी चांगलंच पेटलंय!

पाणी चांगलंच पेटलंय!

googlenewsNext

काही चित्रपट अनपेक्षित असा धक्का देऊन जातात आणि असाच एक धक्का मुंगळा या चित्रपटाने दिला आहे. अस्सल ग्रामीण बाजाचा हा चित्रपट दुष्काळी पार्श्वभूमी निवडत पाण्यासारख्या गंभीर विषयावर भाष्य करतो खरा; परंतु हे करताना चित्रपटाने जी लय पकडली आहे त्याने हा ‘मुंगळा’ वरचढ झाला आहे. चेहऱ्यावर हास्याची लकेर अधूनमधून नक्की उमटेल याची तजवीज केल्यामुळे आणि अचूक चिमटे काढत केलेल्या मांडणीमुळे चित्रपटाचा आशय मनाची पकड घेतो आणि मातीशी अचूक नाळ जुळवत या चित्रपटातले पाणी चांगलंच पेटल्याचे दाखवून देतो.
निसर्गातला दुष्काळ आणि माणसाच्या मनातला दुष्काळ याचा संबंध जोडत चित्रपटाने दमदार काम करून ठेवले आहे. एका दुष्काळी गावातली ही गोष्ट आहे. जिथे पिण्याच्या पाण्याची वानवा, तिथल्या माणसांचे जीवन कसे असणार याचे चित्रण हलक्याफुलक्या पद्धतीने करीत हा ‘मुंगळा’ त्यावर ठोस भाष्य करतो. शहरातल्या बेकारीला वैतागून
किसन हा उमदा तरुण त्याच्या
गावात परत येतो; पण गावातही सगळाच दुष्काळ असल्याचे त्याला कळून चुकते.
दुष्काळी स्थितीमुळे गावकऱ्यांना चकाट्या पिटण्याशिवाय काही उद्योग उरलेला नसतो. किसनही मग गावच्या पारावर बसून मित्रांसोबत उनाडक्या करीत राहतो. अशा स्थितीत एकदा चंद्रावर पाणी सापडल्याची बातमी गावात पसरते आणि किसनच्या डोक्यात अचाट संकल्पना मूळ धरू लागते. गावात वाहू लागलेल्या निवडणुकीच्या वाऱ्याचा पुरेपूर उपयोग करून घेत तो गावातला दुष्काळ संपवण्यासाठी भन्नाट शक्कल लढवतो. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर जबाबदारी सांभाळणाऱ्या विजय देवकर यांनी या चित्रपटातून सुखद असा धक्का दिला आहे. कोणत्याही बाबीचे अवडंबर न माजवता चित्रपटाच्या अगदी साध्यासुध्या मांडणीतून त्यांनी मोठी मजल मारली आहे. एकीकडे दुष्काळावर भाष्य करायचे, पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधायचे, त्याचवेळी विषय क्लिष्ट किंवा गुंतागुंतीचा होऊ न देता थेट मनाला स्पर्श करीत जाईल अशी मांडणी करायची़ या सगळ्याचे व्यवधान त्यांनी सक्षमतेने पेलले आहे. जमिनीखाली जिथे पाणी असेल तिथली माती उकरणाऱ्या मुंगळ्याचे रूपक वापरत त्यांनी सांगितलेली सरळ गोष्ट तितक्याच साधेपणाने मनात उतरत जाते. लोकेश गुप्ते, ज्योती जोशी, सुहास पळशीकर, गणेश यादव, चेतन दळवी, जनार्दन परब, दीपक करंजीकर, मृणालिनी जांभळे, गौरी देशमुख यांच्यासह इतर कलावंतांच्या अभिनयातली सहजता चित्रपटाच्या जातकुळीशी अचूक मेळ खाणारी आहे. सारा श्रवणच्या आयटेम साँगची फोडणीही चित्रपटाला आहे. दुष्काळ, पाणी आणि मुंगळा यांचे धागे जुळवत चित्रपटाने केलेली कामगिरी आश्वासक आहे आणि आटोपशीर पद्धतीने, थोडक्यात पण महत्त्वाचे काही सांगू पाहणाऱ्या या चित्रपटाने घेतलेली मोठी झेप त्याची साक्ष देण्यास पुरेशी आहे.

Web Title: The water is so good!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.