वऱ्हाड निघाले उस्मानाबादला..!

By Admin | Published: April 13, 2017 03:03 AM2017-04-13T03:03:56+5:302017-04-13T03:03:56+5:30

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या, ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

Varhad leaves Osmanabad ..! | वऱ्हाड निघाले उस्मानाबादला..!

वऱ्हाड निघाले उस्मानाबादला..!

googlenewsNext

- राज चिंचणकर,  मुंबई

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या, ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. रंगकर्मींचे वऱ्हाड उस्मानाबाद मुक्कामी निघण्यास सज्ज झाले आहे. नियोजित संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली २१ ते २३ एप्रिल या कालावधीत हे संमेलन संपन्न होणार आहे. उस्मानाबाद येथे प्रथमच नाट्य संमेलन होत असल्यामुळे, स्थानिक कलावंत आणि रसिकजनांना या संमेलनाविषयी कुतूहल आहे.
नाट्य संमेलनासाठी उस्मानाबादच्या तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे ६८ हजार स्क्वेअर फुटांचा मंडप बांधण्यात येत आहे. या मंडपात ४ हजार स्क्वेअर फुटांचा रंगमंचही उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, शहरातील महत्त्वाच्या चौकांच्या सुशोभीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. नाट्य संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या स्थानिक कार्यक्रमांच्या रूपरेषेवर अखेरचा हात फिरवण्यात येत आहे.
नाट्य संमेलनात विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. यासाठी आर. पी. कॉलेज रंगमंचाच्या उभारणीचे काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या आधुनिकीकरणाचे काम सुरू आहे.
नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. परिवहनमंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री दिवाकर रावते, तसेच दुग्धविकासमंत्री महादेव जानकर या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद आ. सुजितसिंह ठाकूर भूषविणार आहेत. नाट्य संमेलनाचा समारोप सोहळा २३ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित राहाणार आहेत. संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर, ‘तुझे आहे तुजपाशी’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे, तसेच ‘षड्यंत्र’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘नक्षत्रांचे देणे’ आदी कार्यक्रमही होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात २२ एप्रिल रोजी नियोजित नाट्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे.

विशेष ‘नाट्य महोत्सव’
नाट्य संमेलनाचा पूर्वरंग म्हणून १६ ते २० एप्रिल या कालावधीत विशेष ‘नाट्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत ‘आॅल दी बेस्ट’, ‘हसवा फसवी’, ‘पारंपरिक लावणी’, ‘नटरंगी नार’, ‘तुम्हीच माझे बाजीराव’, ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकांचे प्रयोग सादर होणार आहेत. नाट्य संमेलनाला रंगभूमीवरील आघाडीचे कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित राहातील, अशी अपेक्षा नाट्य परिषदेकडून वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Varhad leaves Osmanabad ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.