‘वाजले की बारा’ गाजले, पण...
By Admin | Updated: July 13, 2015 02:33 IST2015-07-13T02:33:23+5:302015-07-13T02:33:23+5:30
मला जाऊ द्या ना घरी... आता वाजले की बारा...’ मराठीतील सुपर डुपर हिट गाणे ठरले. संगीतकार अजय-अतुलपासून सगळ्यांनाच याने स्टारडम दिले. पण

‘वाजले की बारा’ गाजले, पण...
‘मला जाऊ द्या ना घरी... आता वाजले की बारा...’ मराठीतील सुपर डुपर हिट गाणे ठरले. संगीतकार अजय-अतुलपासून सगळ्यांनाच याने स्टारडम दिले. पण प्रत्यक्षात हे गाणे पडद्यावर साकारणाऱ्या अमृता खानविलकरला मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. एकदा हिट झाल्यानंतर कलाकारावर त्याच प्रकारच्या भूमिकांचा भडिमार होतो; मात्र अमृताला आॅफर्स आल्या नाहीत. खुद्द अमृतानेच हा गौप्यस्फोट केला आहे. खरंतर ‘ती’ दिसते छान, नाचतेही उत्तम... पण मराठीवर तितकेसे प्रभुत्व नसल्यामुळे कदाचित तिला या प्रकारच्या आॅफर्स आल्या नसतील. लावणीमध्येच लोकांनी अधिक लक्षात ठेवल्यामुळे त्यानंतर चित्रपटाच्या आॅफर येणेच कमी झाल्याचे तिला वाटते. त्यामुळेच आता ती पुन्हा एकदा नृत्यातील आपले कौशल्य दाखविण्याच्या तयारीत आहे. यासाठी तिने ‘नच बलिये’चे व्यासीपठ निवडले आहे. अमृता आणि तिचा नवरा हिमांशू मल्होत्रा फिनालेमध्ये पोहोचले आहेत, याचे औचित्य साधून या जोडीने ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली.
अमृता म्हणाली, की नृत्य आणि अभिनय या दोन्हीची ‘पॅशन’ आहे, पण मराठीमध्ये नायिकाप्रधान विषयांच्या कमतरतेमुळे अभिनयाला फारसा वाव मिळाला नाही. मात्र नृत्यामध्ये अभिनयापेक्षा जास्त ‘टॅलेंट’ दाखविण्याची संधी मिळत असल्याने डान्समध्ये स्वत:ला झोकून देते. यामुळेच माझ्या डान्सला रसिकांची पसंती मिळत आहे. मराठीतील कलाकार हिंदीमध्ये तितकेसे यशस्वी होत नाहीत, अशी टीका केली जाते, याबाबत अमृता म्हणाली, की यशापयशाची मोजमापं कशी ठरवली जातात? त्याचे निकष कोणते? त्या कलाकाराचा चित्रपट बॉक्स आॅफिसवर किती हिट ठरला? का त्याने कितीचा गल्ला जमविला? या समीकरणांमध्ये मराठी कलाकार बसत नसेलही, पण मराठी कलाकारांमध्ये हिंदीपेक्षाही अनेक टॅलेंटेड कलाकार मंडळी आहेत आणि त्यांनी आपली अभिनय क्षमता सिद्धदेखील केली.