टीव्ही स्टार्सचा नशेत तमाशा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2017 03:58 IST2017-03-26T03:58:59+5:302017-03-26T03:58:59+5:30

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा सध्या त्याच्या कॉमेडीपेक्षा आपल्या सहकलाकारांशी केलेल्या मारामारीमुळे चर्चेत आहे

TV star's intoxicated spectacle! | टीव्ही स्टार्सचा नशेत तमाशा!

टीव्ही स्टार्सचा नशेत तमाशा!

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा सध्या त्याच्या कॉमेडीपेक्षा आपल्या सहकलाकारांशी केलेल्या मारामारीमुळे चर्चेत आहे. सुनील ग्रोव्हर आणि चंदन प्रभाकर यांच्याशी हुज्जत घालताना त्यांना चोपण्यापर्यंत कपिलने कारनामा केल्याने तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याने हा कारनामा दारूच्या नशेत केल्याने तो सध्या टीकेचा धनी ठरला आहे. मात्र कपिल हा पहिलाच स्टार नाही, की ज्याने नशेत असे वादग्रस्त कृत्य करून कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण केली. काही कलाकारांनी तर दारू पिऊन भररस्त्यात तमाशा घातला, शिवाय लोकांना शिव्यांची लाखोलीही वाहिली. अशाच काही टीव्ही कलाकारांच्या कारनाम्यांवर आधारित हा रिपोर्ट...


अंकिता लोखंडे
‘पवित्र रिश्ता’ फेम अंकिता लोखंडेने मे २०१६मध्ये झालेल्या एका पार्टीत दारूच्या नशेत असा काही तमाशा केला होता की, बघणारे चकीत झाले होते. त्या वेळी तिने बॉयफ्रेंड (आता एक्स बॉयफ्रेंड) सुशांत सिंग राजपूतला अशा काही शिव्या दिल्या होत्या, ज्या ऐकून इतरांनी कानावर हात ठेवला नसेल तरच नवल. अंकिता इथवरच थांबली नाही, तर तिने सुशांतच्या श्रीमुखातही भडकावल्याचा दावा केला जात आहे.

करण पटेल
‘ये है मोहब्बते’ फेम करण पटेल काम्या पंजाबीला डेट करीत असल्याच्या बातमीमुळे चर्चेत आला होता. मात्र काम्यासोबत त्याचे हे प्रेमप्रकरण फार काळ टिकले नाही. काम्यासोबतच्या ब्रेकअपनंतर केवळ दोनच महिन्यांत त्याने अंकिता भार्गव हिच्याशी विवाह केला. त्यानंतर ‘बॉक्स क्रिकेट लीग’मध्ये करणने दारू पिऊन असा काही तमाशा केला की, चक्क काम्या पंजाबीची तो माफी मागत होता. करण एवढ्यावरच थांबला नाही, त्याने तिला परत फ्रेण्डशिपची मागणी केली. मात्र करणची ही मागणी काम्याने फेटाळून लावली.

सिद्धार्थ शुक्ला
‘बालिका बधू’ फेम सिद्धार्थ शुक्ला याला २०१५मध्ये दारूच्या नशेत ड्रायव्हिंग करताना मुंबई पोलिसांनी जुहू येथे पकडले होते. तसेच त्याच्यावर ड्रिंक अ‍ॅण्ड ड्राइव्हचा गुन्हाही दाखल केला होता. या वेळी पोलिसांनी सिद्धार्थला दोन हजार रुपयांचा फाइनही लावला होता.

अपूर्व अग्निहोत्री आणि
शिल्पा सकलानी

पाच वर्षांपूर्वी अपूर्व अग्निहोत्री आणि शिल्पा सकलानी यांच्यासह ८६ लोकांना जुहू येथील एका हॉटेलधील हाय प्रोफाइल रेव्ह पार्टीत पोलिसांनी पकडले होते. या वेळी सगळ्यांनीच दारू आणि ड्रग्जची नशा केली होती. अपूर्व आणि शिल्पा यांनी ड्रग्ज घेण्याबाबतचा पोलिसांचा दावा फेटाळून लावला होता.

राजा चौधरी
अभिनेत्री श्वेता तिवारीचा पूर्वपती राजा चौधरी याच्यावर श्वेताने घरगुती अत्याचाराचा आरोप लावला होता. श्वेताने केलेल्या आरोपांनुसार राजा दररोज दारूच्या नशेत घरी येत होता आणि तिला मारपीट करत होता. त्या वेळी श्वेताने पोलिसांकडे वेळोवेळी राजाविषयी मारपीट तसेच शिवीगाळ करीत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. पुढे २०१२मध्ये त्यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर श्वेताने अभिनव कोहली याच्याशी विवाह केला.

राहुल महाजन
रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार राहुल महाजन याच्यावर त्याच्या दोन्ही पत्नी श्वेता आणि डिंपी यांनी मारपीट केल्याचा आरोप केला होता. डिंपीने तर असा आरोप केला होता, की राहुलने दारूच्या नशेत तिच्यावर हात उगारला. राहुल महाजन ड्रग्ज घेत असल्याचेही समोर आले होते.

राहुलराज सिंह
प्रत्युषा बॅनर्जीचा बॉयफ्रेंड राहिलेला राहुलराज सिंह याच्यावर गेल्या सहा महिन्यांपूर्वीच दारूच्या नशेत ड्रायव्हिंग करीत असल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हते. जेव्हा त्याने या दोन्ही प्रकरणात पेनल्टी भरली तेव्हा त्याला सोडण्यात आले होते.

गौरव शर्मा
‘ड्रीम गर्ल’ या मालिकेत अखेरीस बघावयास मिळालेला गौरव शर्मा जानेवारी २०१६ मध्ये ड्रिंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह प्रकरणात अडकला होता. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते, की मालाड येथे मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर जेव्हा मी लोखंडवाला येथे जात होतो तेव्हा मला तेथे काही मित्र भेटले होते. त्यामुळे माझा ड्रायव्हर निघून गेल्याने मलाच ड्रायव्हिंग करावी लागली. त्यामुळेच ही घटना घडली होती. गेल्या एक वर्षापासून मी दारूकडे बघितलेदेखील नव्हते. मात्र पार्टीत मित्रांनी हट्ट केल्यानेच हा सर्व प्रकार घडला. एक चूक माणसाला किती अडचणीत आणू शकते हे मला तेव्हा कळाले होते, असे त्याने सांगितले होते.

Web Title: TV star's intoxicated spectacle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.