शाहीर साबळे यांना श्रद्धांजली

By Admin | Updated: July 29, 2015 03:55 IST2015-07-29T03:55:23+5:302015-07-29T03:55:23+5:30

‘जय जय महाराष्ट्र माझा’ या कवनामधून मराठी माणसाच्या मनात महाराष्ट्राविषयीचा अभिमान जागृत करणारे एक नाव म्हणजे ‘शाहीर साबळे’. मराठी लोकगीतं आणि महाराष्ट्राची समृद्ध लोककला

Tribute to Shahir Sabale | शाहीर साबळे यांना श्रद्धांजली

शाहीर साबळे यांना श्रद्धांजली

‘जय जय महाराष्ट्र माझा’ या कवनामधून मराठी माणसाच्या मनात महाराष्ट्राविषयीचा अभिमान जागृत करणारे एक नाव म्हणजे ‘शाहीर साबळे’. मराठी लोकगीतं आणि महाराष्ट्राची समृद्ध लोककला सातासमुद्रापार पोहोचविण्याबरोबरच ‘मुक्तनाट्य’ आविष्काराच्या निर्मितीची बीजे पेरण्याचे श्रेय जाते ते याच शाहिराला. आपल्या नाटकांमधून समाजप्रबोधनाचं कार्य करताना ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हे ह्क्काचं व्यासपीठ त्यांनी तरुणाईला मिळवून दिलं. मराठी शाहिरी परंपरा आणि लोककला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची कामगिरी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाने केली; परंतु शाहीर साबळे यांच्या निधनानंतर त्यांचे हे उत्तुंग कार्य पडद्याआड जाऊ नये, याच प्रांजळ भावनेतून त्यांचे नातू प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे ‘मी आणि शाहीर साबळे’ या कार्यक्रमाद्वारे आजोबांना अनोखी मानवंदना देणार आहेत.
केदार शिंदे म्हणाले की, शाहीर साबळे यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग, आठवणी, किस्से यांसह प्रसिद्ध लोकगीते, प्रहसनं आणि नाटकातील प्रवेशांची मनोरंजनात्मक मेजवानी सादर केली जाणार आहे. संतोष पवार, भरत जाधव तसेच प्रसन्नजीत कोसंबी, रोहित राऊत आणि सायली पंकज आदी कलाकार यामध्ये सहभागी होतील. खरे तर यावर एखादा चित्रपट, नाटक किंवा मालिकादेखील होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून विचारही सुरू आहे. मात्र, सध्या तरी दृक्श्राव्य माध्यमातून त्याचे सादरीकरण करण्यावर भर दिला जाईल. व्यावसायिक समीकरणांचा विचार न करता, संपूर्ण वैयक्तिक खर्चातून हा कार्यक्रम निर्मित करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यक्रमाचे मुंबईमध्येच तीन शो करणार आहे, पुण्यामध्ये हा कार्यक्रम सादर करण्याची इच्छा आहे; पण शाळांनी किंवा चॅरिटेबल संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यावा.

Web Title: Tribute to Shahir Sabale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.