उंबरठा ओलांडणारे कणखर माप!
By Admin | Updated: February 26, 2016 21:25 IST2016-02-26T21:25:09+5:302016-02-26T21:25:09+5:30
गेल्याच आठवड्यात मनोविभ्रमाची गहिरी डूब असणारी व्यक्तिरेखा रंगवणाऱ्या तेजस्विनी पंडितचा लागोपाठ आलेला आणि तिच्या अभिनयाची ताकद दाखवून देणारा चित्रपट म्हणून ‘तिचा उंबरठा’ या चित्रपटाकडे पाहता येईल

उंबरठा ओलांडणारे कणखर माप!
राज चिंचणकर -
गेल्याच आठवड्यात मनोविभ्रमाची गहिरी डूब असणारी व्यक्तिरेखा रंगवणाऱ्या तेजस्विनी पंडितचा लागोपाठ आलेला आणि तिच्या अभिनयाची ताकद दाखवून देणारा चित्रपट म्हणून ‘तिचा उंबरठा’ या चित्रपटाकडे पाहता येईल. पुरुषसत्ताक पद्धतीवर कोरडे ओढणारी आणि उंबरठ्यावरचे माप कणखरतेने ओलांडणारी सक्षम भूमिका हे या चित्रपटातल्या तिच्या व्यक्तिरेखेचे आणि पर्यायाने या चित्रपटाचेच वैशिष्ट्य आहे. एवढे सोडले, तर मात्र यात फार काही नावीन्य आहे अशातला भाग नाही. पण पुरुषी वर्चस्वावर एका स्त्रीने केलेली मात मात्र यातून ठसते.
पती-पत्नीच्या नात्यात निर्माण झालेला तिढा आणि त्यावर पत्नीने घेतलेली ठोस भूमिका हा या कथेचा गाभा आहे. सुखवस्तू कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या यातल्या दिनेश या नायकाला त्याची पत्नी विभा हिच्याबाबत काही स्वारस्य उरले नसल्याने आणि त्याचा जीव त्याच्या सेक्रेटरीत गुंतल्याने तो विभाकडे सरळ घटस्फोट मागतो. साहजिकच, विभा कोलमडते; पण काही काळानंतर ती त्यातून सावरत अतिशय वेगळा निर्णय घेते. यात तिच्या सासूबाई तिची पाठराखण करतात. कथेतला हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि विभाचे एकूणच ओढवलेल्या परिस्थितीकडे कणखर दृष्टीने पाहणे हा या कथेतला टर्निंग पॉइंट आहे.
कथा, पटकथा व संवाद अशी या चित्रपटाची जबाबदारी सांभाळणाऱ्या जयंत पवार यांच्याच नाटकावर हा चित्रपट बेतला आहे. त्यांच्या या लेखनातून समाजातल्या पुरुषी वर्चस्वाचे चित्र उभे राहते आणि त्यावरचे भाष्य यात येते. पण त्याचबरोबर केवळ मनात यावे आणि पतीने पत्नीशी काडीमोड घ्यावा, ही समाजमनाच्या सहज पचनी न पडणारी घटना अतिशय सहजतेने चित्रपटात येते. मात्र या घटनेनंतरच कथेला वेगळे वळण मिळते. त्यामुळे मूळ पायाकडे दुर्लक्ष करावे लागते. चित्रपटातल्या व्यक्तिरेखांची बांधणी मात्र ठसठशीत झाली आहे आणि संवादांनी बाजी मारली आहे. दिग्दर्शक प्रदीप घोणसीकर यांनी या कथेची मांडणी करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. मात्र यात कलात्मकता दाखवण्याचा भाग जरा जास्त झाला आहे. काही प्रसंगांत कॅमेऱ्याचे विविध कोनांतून लावलेले अँगल्सही खटकतात.
तेजस्विनी पंडितने यातली विभा सक्षमतेने रंगवली आहे. प्रथम तिचे कोलमडून जाणे, नंतर एका विशिष्ट निर्णयाप्रत येणे आणि त्यावर ठाम राहत स्वत:चे म्हणणे शेवटपर्यंत टिकवून ठेवणे, इतकी व्हेरिएशन्स तिने उत्तम दाखवली आहेत. ज्योती चांदेकर यांची सासूबाईसुद्धा दमदार आहे. त्यांचा करारीपणा, तसेच त्यांना मिळालेल्या धारदार संवादांनी ही व्यक्तिरेखा ठाशीव झाली आहे. ही कथा स्त्रियांच्या नजरेतून लिहिली गेली असल्याने यात पुरुष व्यक्तिरेखेला तितकासा वाव नाही. त्यानुसार यात दिनेश साकारताना चिन्मय मांडलेकरच्या वाट्याला जे काही प्रसंग आलेले आहेत, ते त्याने नीट रंगवले आहेत. सुयश टिळक, शीतल शुक्ल यांची कामगिरी चांगली आहे. एकूणच, स्त्रीत्वाचा हुंकार अशा पठडीतल्या या चित्रपटाचा उंबरठा केवळ तेजस्विनी पंडित आणि ज्योती चांदेकर यांच्या अभिनयासाठी ओलांडायला हरकत नाही.