वेगळ्या संकल्पनेची रंजक गोष्ट...!
By Admin | Updated: March 6, 2017 02:36 IST2017-03-06T02:36:48+5:302017-03-06T02:36:48+5:30
मुलांना दत्तक घेणे ही आता नवीन बाब राहिलेली नाही

वेगळ्या संकल्पनेची रंजक गोष्ट...!
- राज चिंचणकर
मुलांना दत्तक घेणे ही आता नवीन बाब राहिलेली नाही, परंतु त्याउलट म्हणजे, आई-वडिलांनाच कुणी दत्तक घ्यायचा विचार केला, तर ती घटना आगळीवेगळी ठरू शकते. हीच संकल्पना एखाद्या नाटकाची असल्यावर साहजिकच त्या नाटकात ‘नाट्य’ निर्माण होणारच. परिणामी, त्या कलाकृतीबद्दलची उत्सुकताही वाढीस लागणार. अशीच उत्कंठा कायम ठेवत, ‘माझी आई तिचा बाप’ हे नाटक मंचित होते. नाटकाच्या मूळ संकल्पनेतच वेगळेपणा असल्याने, तिच्या मांडणीविषयीच्या अपेक्षा वाढतात आणि त्याबरहुकूम या नाटकाने ही अपेक्षापूर्ती करण्याचा यथायोग्य प्रयत्न केला आहे.
स्वरा व मधुर हे तरुण दांपत्य आहे आणि दोघेही अनाथ आहेत. ज्या अनाथाश्रमात ते वाढले, त्याचे सर्वेसर्वा बद्रीअण्णा यांचा त्यांना आधार आहे. स्वरा व मधुरच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला, आता घरात पाळणा हलला पाहिजे, अशी अपेक्षा बद्रीअण्णा त्यांच्याकडे व्यक्त करतात, पण बाळासाठी आजी-आजोबा हवेतच, असा हट्ट स्वरा धरते. मग यातून त्या दोघांचा दत्तक आई-वडिलांसाठी शोध सुरू होतो. त्यांच्या या धडपडीला यश येते आणि या नाट्यात ‘दत्तक’ आई-वडिलांची एन्ट्री होते. पुढे जे काही घडते, त्याचे रंजक सादरीकरण म्हणजे हे नाटक आहे.
रेणुका भिडे हिची मूळ संकल्पनाच इतकी ठोस आहे की, त्यावर बेतलेल्या नाटकात काही खास अनुभवायला मिळेल, हा अंदाज अजिबात चुकीचा ठरत नाही. मुळात या संकल्पनेतच खरे नाट्य आहे. त्यावर फ्रान्सिस आॅगस्टीन यांनी या नाटकाची संहिता लिहिली आहे. मूळ प्लॉटच भक्कम असल्याने, त्यावर त्यांना बांधकाम करताना मोठा वाव मिळाला आहे. मात्र, या गोष्टीचा शेवट पठडीबाज होण्यापासून दूर ठेवता आला असता, तर ते अधिक परिणामकारक झाले असते. या नाटकाचा विषय पाहता, हे नाटक गंभीर वळणावर जाऊ शकते. मात्र, लेखकाने त्याला चटपटीत
संवादांची जोड दिल्याने, निखळ करमणुकीचा बाज या नाट्याने पकडला आहे.
दिग्दर्शक सुदेश म्हशीलकर यांनी संहितेला अपेक्षित असलेली लय पकडत तिची मांडणी केली आहे. नाटकाचा एकूण आकृतिबंध त्यांनी चांगला बांधला आहे. यात असलेल्या गाण्याचाही चपखल वापर त्यांनी करून घेतला आहे. फक्त यात वडिलांचे जे मालवणी पात्र आहे, त्यांच्या संवादांचा टोन अधूनमधून सुटत असल्याचे जाणवते. बाकी, पात्रांच्या एकूण रंगमंचीय वावरावर त्यांनी केलेले काम लक्षात राहाते.
या नाटकातल्या कलावंतांनी अभिनयाची पातळी योग्यरीत्या सांभाळली आहे. मोहन जोशी (वडील) आणि स्मिता जयकर (आई) या दोघांचे ट्युनिंग यात उत्तम जमले आहे. मोहन जोशी यांनी इरसालपणाचा नमुना पेश करत, रंगवलेले वडील फर्मास आहेत. स्मिता जयकर यांनीही त्यांना योग्य साथ दिली आहे. नाटकाचा केंद्रबिंदू म्हणावा लागेल, अशी यातली स्वराची भूमिका पूर्वी भावे हिने छान साकारली आहे. तिचा फ्रेशनेस आणि चपळ वावर यात एकप्रकारची ग्रेस आहे. त्यामुळे नाटकाचा ताजेपणाही टिकून राहिला आहे. अजित केळकर यांचा
बद्रीअण्णा झकास, तर सचिन देशपांडे याचा मधुर यातल्या नावाप्रमाणेच मधुर आहे.
उत्तम रंगसंगती असलेल्या सचिन गावकर यांच्या नेपथ्यावर, शीतल तळपदे यांनी केलेली प्रकाशयोजना जमून आली आहे, तर मयुरेश माडगावकर यांचे संगीत नाट्याला पूरक आहे. अनंत पणशीकर यांच्या ‘नाट्यसंपदा कलामंच’ या संस्थेने रंगभूमीवर आणलेले हे नाटक म्हणजे, हलक्याफुलक्या मनोरंजनाचा डोस आहे. तनमनाला फ्रेश करण्यासाठी असा डोस अधूनमधून आवश्यक असतो आणि ती गरज या नाटकाने पूर्ण केली आहे.