‘तुमचं आमचं सेम’ असलेल्या प्रेमाची गोष्ट

By Admin | Updated: August 20, 2015 23:51 IST2015-08-20T23:51:30+5:302015-08-20T23:51:30+5:30

प्रेम तर काय होतंच... कोणाला लग्नाआधी तर कोणाला लग्नानंतर... काहींना ते व्यक्त करता येतं तर काहींना जमत नाही... काहींचं सफल होतं... तर काहींचा प्रेमभंग होतो

The thing about love of 'ours is ours' | ‘तुमचं आमचं सेम’ असलेल्या प्रेमाची गोष्ट

‘तुमचं आमचं सेम’ असलेल्या प्रेमाची गोष्ट

प्रेम तर काय होतंच... कोणाला लग्नाआधी तर कोणाला लग्नानंतर... काहींना ते व्यक्त करता येतं तर काहींना जमत नाही... काहींचं सफल होतं... तर काहींचा प्रेमभंग होतो... पण आयुष्यात प्रत्येकालाच कोणाबद्दल तरी प्रेम वाटतंच. मात्र प्रेमात पडण्याआधी जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा आणि प्रेमात पडल्यानंतर होणारे मतांतर यामध्ये कधी-कधी जमीन-अस्मानाचा फरक असतो. बरं त्यात कुटुंब, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्याही अपेक्षा असतातच. पण तरीही जो जोडीदार आणि कुटुंब दोन्हीच्या मतांचा आदर करतो आणि काही प्रमाणात का होईना त्या अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करतो तो खरा माणूस... आणि हे तर तुमच्या-आमच्यासारख्यांच्या सर्वांच्याच आयुष्यात घडत असतं. म्हणूनच ‘तुमचं आमचं सेम असतं’... नेमकं हेच काहीशा गंभीर, खट्याळ, विनोदी संवादातून आणि टिपिकल कट-कारस्थान, व्हिलन या विश्वाला दूर ठेवून सांगायचं ठरवलं आहे. स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होणारी मालिका ‘तुमचं आमचं सेम असतं’मधून. या आगामी मालिकेच्या निर्माती दीप्ती तळपदे, अभिनेता श्रेयस तळपदे, स्टार प्रवाहचे विक्रांत जोशी, मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारा श्रवण शिंदे आणि अमृता देशमुख यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली.

सध्या सर्वच मालिका बहुतांशी लव्ह स्टोरीवर आधारित असतात; मग या मालिकेमध्ये प्रेक्षकांना वेगळं काय अनुभवायला मिळणार आहे, असे विचारल्यावर श्रेयस सांगतो, वर्षानुवर्षे गोष्टी सेमच असतात, पण आपण त्या लोकांना कोणत्या पद्धतीने दाखवतो आणि त्यामध्ये काय वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो, ते महत्त्वाचं असतं. ही मालिका संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणून एन्जॉय करू देते. लव्ह स्टोरी हा बेस फक्त सेम आहे.

पण आपल्या मुलीला एखादा मुलगा आवडतो हे समजल्यावर तिच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया, त्यांची प्रश्नोत्तरे आणि या सर्वांना समजूतदारपणे उत्तर देणारा मुलगा हे बऱ्याचदा बघायला मिळतं. आई-वडिलांनीही त्यांच्या तरुण वयात या गोष्टी केलेल्या असल्याने त्या वयात त्यांना ते नॉर्मलच वाटत असतं. मात्र आपल्या मुलांच्या बाबतीत घडताना त्यामागे काळजी असते आणि हेच नेमकं बऱ्याच जणांच्या बाबतीत सेमच असतं, त्यामुळे ही मालिका करावीशी वाटली.

निर्माती दीप्ती तळपदे सांगतात, श्रेयसने हिंदीतही बरेच काम केले असल्याने त्याला तेथील ग्लॅमर काही प्रमाणात मराठीमध्येही आणायची इच्छा असते. बऱ्याचदा त्याच्या कामातून ते दिसतंही. पण काही वेळा मालिका किंवा चित्रपटाची गरज बघून निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे श्रेयस मालिका किंवा चित्रपटासाठी कशाची गरज आहे, ते सांगतो आणि बजेटनुसार आम्ही त्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.

स्टार प्रवाहचे विक्रांत जोशी सांगतात, अनेकदा प्रेक्षकांकडून अशी तक्रार येते की मालिका रटाळ होत चालली आहे. कधी ग्रामीण तर कधी शहरी भागातील लोकांना एकच मालिका आवडते असं नाही. अशा वेळेला चॅनेलकडून यावर सर्वेक्षण केले जाते, की लोकांना काय पाहायला आवडतंय, आवडत नसेल तर त्याचं कारण काय किंवा प्रेक्षकांना काय अपेक्षित आहे. आणि त्यानुसार बदल केले जातात.

अमृता देशमुख सांगते, मला माझ्या वयाला सूट होणारी भूमिका साकारायला मिळतेय याचा खूप आनंद आहे आणि विशेष म्हणजे कोणतीही कट-कारस्थान न करणारी, आई-वडिलांचं नातं दाखवणारी भूमिका करायला मिळतेय. त्यामुळे मला स्वत:ला या मालिकेबद्दल खूप उत्सुकता आहे आणि ही केवळ तरुणांसाठी असलेली मालिका नसून अबालवृद्धांचेही मनोरंजन करणारी आहे. कारण, यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात येणारे ते क्षण, व्यक्त केल्या जाणाऱ्या भावना यावर भर दिला आहे.

श्रेयस तळपदे या हिंदीमध्येही उत्कृष्ट भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्याकडून काय टिप्स मिळाल्या, असे विचारल्यावर श्रवण शिंदे सांगतो, सुरुवातीला ही भूमिका करायला मिळेल, असं वाटलंही नव्हतं. पण भूमिका मिळाल्यावर आपलं काम श्रेयससारख्या अनुभवी कलाकाराला आवडेल का, याचं टेन्शन होतं. पण श्रेयस सेटवर कधीच निर्माता असल्यासारखं वागत नाहीत, उलट ते स्वत:हून आम्हाला खूप गोष्टी सांगतात.

Web Title: The thing about love of 'ours is ours'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.