रंगभूमी ही तीर्थासारखी
By Admin | Updated: August 12, 2015 04:46 IST2015-08-12T04:46:25+5:302015-08-12T04:46:25+5:30
गेल्यावर्षी २५ नोव्हेंबर रोजी अण्णांचा ९४वा वाढदिवस ‘जागतिक रंगभूमी दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. अण्णांनी केलेल्या मराठी रंगभूमीच्या सेवेला मानवंदना देण्यासाठीच

रंगभूमी ही तीर्थासारखी
गेल्यावर्षी २५ नोव्हेंबर रोजी अण्णांचा ९४वा वाढदिवस ‘जागतिक रंगभूमी दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. अण्णांनी केलेल्या मराठी रंगभूमीच्या सेवेला मानवंदना देण्यासाठीच मराठी नाट्य कलाकार संघाने हा सोहळा घडवून आणला होता. या सोहळ्यात अण्णांचा विशेष सत्कार करण्यात आला. वार्धक्यामुळे अण्णांचं निवेदन त्या वेळी वाचण्यात आलं. त्यात अण्णांनी नव्या पिढीतील कलावंतांना संदेश देताना म्हटले, की रंगभूमी तीर्थासारखी पवित्र आहे त्याचं पावित्र्य भंग करू नका.
भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९२१ चा. नाट्यवर्तुळात ते सर्वांचे ‘अण्णा’ होते. अण्णांची खरी ओळख होती ललितकलादर्श ही नाट्यसंस्था. भारतीय रंगभूमीचा एक गौरवशाली ठेवा असलेल्या या संस्थेचा अण्णांनी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. संस्थेची वैभवशाली परंपरा जोपासली. १०७ वर्षांची ही संस्था केवळ अण्णांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळेच आजही तरुण आहे. केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ, बालगंधर्व, मामा पेंडसे, बापूराव पेंढारकर, बाबूराव पेंटर, मा. विनायक, व्ही, शांताराम, भालजी पेंढारकर अशा दिग्गजांच्या अभिनयाला रंगमंच देणाऱ्या ललितकलादर्शच्या वैभवाला त्यांनी नवी झळाळी दिली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत या नाट्यसंस्थेची विस्कटलेली घडी पुन्हा बसवली. अण्णांनी सुरुवातीला काही काळ जुनीच नाटकं नव्याने सादर केली. सत्तेचे गुलाम, भावबंधन, संगीत सोन्याचा कळस ही नाटकं आणि चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत गोखले अशी कसदार गायक-नटमंडळी यांनी अण्णांना संस्था पुन्हा उभी करण्याचे बळ दिले. ‘भावबंधन’मध्ये त्या वेळी लतिकेची भूमिका लता मंगेशकर यांनी साकारली होती. प्रेक्षकांच्या बदलत्या अभिरुचीमुळे हा प्रयोग फार काळ चालला नाही. त्यामुळेच नंतर अण्णांनी नव्या नाटकांचे शिवधनुष्य उचलले. बाळ कोल्हटकरांचं दुरितांचे तिमिर जाओ, विद्याधर गोखल्यांचं पंडितराज जगन्नाथ, बावन्नखणी, जय जय गौरीशंकर, आनंदी गोपाळ, रक्त नको मज प्रेम हवे अशी अनेक नाटकं ललितकलादर्शने रंगभूमीवर आणली. पुढे विजया मेहता, दामू केंकरे, सुधा करमरकर, अरविंद देशपांडे, विजय तेंडुलकर यांनीही आपल्या कारकिर्दीतले महत्त्वाचे टप्पे ललितकलादर्शच्या माध्यमातूनच गाठले. ग्वाल्हेर घराण्याचे पं. रामकृष्णबुवा वझे यांच्याकडे त्यांनी गायनाचे धडे घेतले. गायन आणि अभिनय या दुहेरी संगमाच्या जोरावरच अण्णांनी अनेक नाटकांमध्ये मुख्य नायकाच्या भूमिका वठवून रसिकांची दाद मिळवली.
1971च्या सुमारास त्यांनी तत्कालीन यशवंतराव चव्हाण यांच्याकडून नाटकाचा एंटरटेन्मेंट टॅक्स रद्द केला, तो आजतागायत आहे. ही त्यांची देण आहे. नाट्यसंमेलनाचे ते जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी नाटकाचे डॉक्युमेंटेशन व्हावे, असे सुचवले. त्यातून प्रेरणा घेत विदर्भ साहित्य संघाने ५०० नाटकांचे ‘प्रयोगक्षम मराठी नाटके’ पुस्तक छापले आहे. त्यात त्याचा इतिहास रचला आहे. संगीत सौभद्रला १२५ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त डोंबिवलीत कार्यक्रम केला होता. त्याच निमित्ताने २००७ मध्ये सावित्रीबाई फुले नाट्यमंदिराचे उद्घाटन झाले. त्या वेळी पेंढारकर आले होते.
- शैलेश प्रभावळकर,
निर्माते-दिग्दर्शक, डोंबिवली
पं. राम मराठे आणि त्यांनी एकत्र असे ५ हजार प्रयोग केले होते़ त्यांच्या नाटकांचे ८ हजार प्रयोग होते. १४ नाटके रंगमंचावर आणली़ आणि त्यांनी ५१ नाटकांमध्ये भूमिका, ‘आनंदी गोपाळ’ची निर्मिती आणि ५ प्रायोगिक नाटके त्यांनी केली़ स्वामिनी हे पु. भा. भावेंचे नाटक केले़ नारद ही भूमिका त्यांनी ९ नाटकांमध्ये केली़ शाब्बास बिरबल शाब्बास, २५० नाटकांचे ध्वनिमुद्रण केले आहे़ हे काम त्यांनी साहित्य संघात आहे. त्यांचा मराठे घराण्याशी ६० वर्षे संपर्क होता. त्यांच्या ‘जय जय गौरीशंकर’चे २२०० प्रयोग झाले़ त्यात आता मी नारदाची भूमिका करतो़ १४ आॅगस्ट रोजी या नाटकाला ५० वर्षे सुुरू होत आहेत. आई तुझी आठवण येते हे त्यांचे आवडते गाणे होते.
- मुकुंद राम मराठे, संगीत, गायक, नट (ठाणे)