मालिकाही करताहेत स्त्रीशक्तीचा जागर

By संजय घावरे | Published: October 2, 2022 12:09 PM2022-10-02T12:09:20+5:302022-10-02T12:10:08+5:30

पूर्वीच्या काळातील काही स्त्रीप्रधान मालिकांनी रसिकांच्या मनात कायमचे घर केले आहे. यात 'दामिनी'पासून 'रजनी'पर्यंत बऱ्याच मालिकांचा समावेश आहे. आजघडीला एक डझनहून अधिक मालिका स्त्रीशक्तीचा जागर करत त्यांची विविध रूपे घरोघरी पोहोचवत आहेत.

They are also doing serials on Women Empowerment | मालिकाही करताहेत स्त्रीशक्तीचा जागर

मालिकाही करताहेत स्त्रीशक्तीचा जागर

googlenewsNext

चित्रपटांप्रमाणेच अलिकडच्या काळातील मराठी मालिकाही कात टाकत आहेत. विविधांगी विषयावर बनणाऱ्या या मालिका जरी वेगवेगळ्या पद्धतीने स्त्रीशक्तीचा जागर करत असल्या तरी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मालिकांपासून खूप दूर असल्याचा सूर आळवला जात आहे. कमी लांबीच्या मालिकांमध्ये खिळवून ठेवणारा कंटेंट सादर करण्याच्या दिशेने मराठी मालिकांची वाटचाल फार धीम्या गतीने सुरू असल्याने उशीरा का होईना भविष्यात मराठमोळ्या मालिकाही कात टाकणार असा विश्वास कलाकारांना वाटतो. सध्या मात्र मराठी मालिकांमध्ये स्त्रीशक्तीचा जागर जोरात सुरू आहे.

पूर्वीच्या काळातील काही स्त्रीप्रधान मालिकांनी रसिकांच्या मनात कायमचे घर केले आहे. यात 'दामिनी'पासून 'रजनी'पर्यंत बऱ्याच मालिकांचा समावेश आहे. आजघडीला एक डझनहून अधिक मालिका स्त्रीशक्तीचा जागर करत त्यांची विविध रूपे घरोघरी पोहोचवत आहेत. सध्या सुरू असलेल्या जवळपास १४ स्त्रीप्रधान मालिकांमधील विषय एकमेकांपेक्षा भिन्न असल्याने प्रेक्षकांनाही काहीतरी नावीन्यपूर्ण पाहिल्याचे समाधान मिळत आहेत. '१०० डेज' तसेच 'जिवलगा'सारख्या मालिकांद्वारे मराठीत वेगळे प्रयोग करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे, पण '२४'सारखी एखादी मराठी मालिकांच्या भेटीला येण्याची उचित वेळ अद्याप आलेली नसल्याचे काही सेलिब्रिटीजचे म्हणणे आहे. मराठी प्रेक्षकांची मानसिकता हळूहळू बदलत असून, त्यांच्या कलेने घेत मेकर्सही तशा प्रकारच्या मालिका तयार करत आहेत. वेब सिरीजसारखा कंटेंट मालिकांमध्ये स्वीकारण्याइतपत क्रांती अद्याप झालेली नसल्याचे मालिका विश्वातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तरुण पिढीचे लक्ष छोट्या पडद्याकडे आकर्षित करायचे असेल, तर सध्या सुरू असलेल्या मालिकांपेक्षा वेगळा; किंबहुना हिंदी मालिकांमध्येही हाताळला गेला नसेल असा रोमांचक कंटेट द्यायला हवा. यासाठी मेकर्सच्या जोडीला वाहिन्यांनीही पुढाकार घेतला तर हे अशक्य नाही. मराठीतून हिंदीकडे वळलेल्या दिग्दर्शकांनी आपल्या मातृभाषेत मर्यादित एपिसोड्सच्या मालिका बनवण्यासाठी वेळ दिला तर पुढील काही वर्षांमध्ये मराठी मालिका विश्वात नवी क्रांती घडेल असेही जाणकारांचे म्हणणे आहे.
..................
पूर्वी गाजलेल्या स्त्रीप्रधान मालिका - दामिनी, श्वेतांबरा, रजनी, बंदिनी, वादळवाट, अवंतिका, रिपोर्टर, शांती, सत्यवती
..................
सध्याच्या स्त्रीप्रधान मालिका - आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा, तुझेच मी गीत गात आहे, लग्नाची बेडी, मुलगी झाली हो, तुमची मुलगी काय करते?, सुंदर आमचे घर, छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं, लेक माझी दुर्गा, भाग्य दिले तू मला, सुंदरा मनामध्ये भरली, सातव्या मुलीची सातवी मुलगी, दार उघड बये, तू चाल पुढे
.....................
हे खूप धाडसी ठरेल - एतशा संझगिरी


बदलाची नांदी झाली असून, नारीशक्तीला महत्त्व दिले जात आहे. हाऊस वाईफपासून वर्कींग वुमनपर्यंत स्त्रीयांची विविध रूपे दाखवली जात आहेत. जर्नी थोडी स्लो आहे, पण सुरुवात आहे. आपल्याकडे ६ ते ९ या वेळेतील मालिका ज्येष्ठ नागरिक, गृहिणी आणि लहान मुलेच पाहू शकतात. २० ते ४० वयोगटातील आॅडीयन्सना टार्गेट करता येत नाही. व्यक्तिगतरीत्या जे मुद्दे बोललेही जात नाहीत त्यावर मालिका करणे खूप धाडसी पाऊल ठरेल. 

मराठीतही कंटेंटप्रेमी प्रेक्षक आहेत - विशाखा सुभेदार


मालिका विश्व खूप बदलले आहे. पारंपरीक विषयाला चिटकून राहिलेला प्रेक्षकवर्गही असल्याने बदलाची गती मंदावली आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार पहायला आवडणाराही वर्ग आहे आणि स्त्रियांनी क्रांती घडवल्याचे चित्र पहायला आवडणाराही प्रेक्षक आहे. त्यांची रुची ओळखून मालिका बनवल्या जातात. '२४'सारख्या मालिकांचा चाहतावर्ग मराठीतही असल्याने तसा कंटेटही मराठी रसिकांना आवडेल. कलाकार म्हणून दोन्ही ठिकाणी काम करायला आवडते.

...तरुणाईही पडेल प्रेमात - गौरी इंगवले


मी जास्त सिरियल्स पहात नाही. कारण आमच्या पिढीला सासू-सुनांच्या मालिका पाहण्यात इंटरेस्ट नाही. आमचा कल मुव्हीज आणि वेब सिरीजमध्ये आहे. आजच्या जनरेशनला मालिकांकडे आकर्षित करायचे असेल तर तसा कंटेंट द्यायला हवा. काहीतरी थ्रिलींग किंवा रहस्यमय असावे जे फास्टही हवे. कमी वेळात बरेच काही पहायला मिळाल्याचे समाधान देणाऱ्या मालिकांची निर्मिती झाली तर तरुणाईही मालिकांच्या प्रेमात पडेल.

रिअॅलिस्टीक गोष्टी भावताहेत - शिवाली परब


'१०० डेज' मालिकेत वेगळा प्रयोग केला गेला. नवनवीन प्रयोग करायला काहीच हरकत नाही. पूर्वीचा मराठी क्राऊड देवादिकांना मानणारा होता, पण आताची जनरेशन सिरीज बघणारी आहे. त्यामुळे काहीतरी वेगळे केले तर आजची जनरेशन नक्कीच स्वीकारेल. रिअॅलिस्टीक कंटेंट भावत आहे. वेब सिरीजमध्ये आपल्याशी रिलेट होणाऱ्या गोष्टी दाखवत असल्याने त्या भावतात. तसे काहीतरी मालिकांमध्ये करायला हवे.

कालांतराने हादेखील बदल होईल - दिशा परदेशी


नवीन बदल घडायला वेळ लागेल. हिंदी प्रेक्षकांनी काही गोष्टी लगेच अॅक्सेप्ट केल्या, पण आपली इंडस्ट्री थोडी भावूक आहे. आताची जनरेशन सेल्फ मेड आणि शिक्षीत असल्याने वास्तव जगात काय चालू आहे हे त्यांना माहित आहे. या जनरेशनला सासू्-सूनेच्या मालिकांपेक्षा वेब सिरीज तसेच डार्क शेड्सच्या फिल्म्समध्ये इंटरेस्ट आहे. ते रिअल झोनमधील फिल्म्समध्ये जास्त रमतात. हळूहळू कालांतराने हादेखील बदल होईल. 

या गोष्टी पहायला आवडतील - कृतिका गायकवाड


आजपर्यंत आपण खूप बदल केले आहेत. शनायाचे कॅरेक्टर लोकांना लगेच आवडणारे नव्हते, पण हा बदल त्यांनी हसत-खेळत स्वीकारला. प्रेक्षक थेट स्वीकारणार नाहीत असे बरेच विषय मराठीत हाताळले आहेत. आजच्या जनरेशनला जे आवडते ते माझी आई-आजीही पाहते. याचा अर्थ मागच्या पिढीतील प्रेक्षकही स्वत:ला बदलतोय. कॅालेजमधल्या वातावरणावरील फ्रेश मालिका किंवा मित्र-मैत्रीणींची गोष्ट पहायला मला आवडेल.

त्या दिशेने वाटचाल सुरू आहे - शुभांगी सदावर्ते


एकीकडे प्रेक्षक 'देवबाभळी'सारखे नाटकही डोक्यावर घेत आहेत, तर दुसरीकडे कंटेंटबेस मालिकांवरही प्रेम करत आहेत. याचा अर्थ मराठी प्रेक्षक दोन्हीकडे समतोल साधून आहेत, पण मराठी मालिकांना काळाच्या पुढे न्यायचे असेल तर नावीन्यपूर्ण असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्लोबल विषय हाताळायला हवेत. नवीन जनरेशनला चाकोरीबाहेरचे काहीतरी थ्रिलिंग द्यायला हवे. मराठी मालिकांची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

मानसिकता बदलायला हवी - पूर्वा पवार


लोकांना आवडत असल्याने तेच-तेच करण्याऐवजी काळानुसार आवश्यक असलेल्या कंटेंटची गरज ओळखून ते देण्याचे धाडस करायला हवे. मराठी प्रेक्षकांनी सकारात्मक बदल मोठ्या मनाने स्वीकारले असून, कौतुकही केले आहे. मराठीत बजेटचा प्रश्न असतो, पण हृदयाला भिडणारे काहीतरी केले तर ते रसिकांपर्यंतही झिरपत जाईल. कलाकार-तंत्रज्ञांनीही तोलूनमापून काम केले तर क्वालिटीही राहिल. प्रेक्षकांवर विश्वास ठेवायला हवा.

Web Title: They are also doing serials on Women Empowerment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.