सोनाली खरे दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल ८ वर्षांनी करतेय टेलिव्हिजनवर कमबॅक
By तेजल गावडे | Updated: October 22, 2020 17:13 IST2020-10-22T17:13:13+5:302020-10-22T17:13:52+5:30
सोनाली यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर टेलिव्हिजन विश्वात पुनरागमन करते आहे.

सोनाली खरे दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल ८ वर्षांनी करतेय टेलिव्हिजनवर कमबॅक
अभिनेत्री सोनाली खरे २०१४ मध्ये ‘बे दुणे दहा’ ह्या टिव्ही मालिकेमध्ये दिसली होती. त्यानंतर ती ‘7, रोशन व्हिला’, ‘हृदयांतर’ या चित्रपटात झळकली. सोनाली यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर टेलिव्हिजन विश्वात पुनरागमन करते आहे. कलर्स मराठीवरच्या ‘आज काय स्पेशल’ ह्या कुकिंगविषयक शोमध्ये सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत ती दिसणार आहे.
आपल्या कमबॅकविषयी सोनाली खरे म्हणते, “मला आनंद आहे की, मी पून्हा एकदा माझ्या आवडत्या टीव्ही क्षेत्रात परततेय. स्वयंपाक करणं, कोणत्याही गृहिणीला नवीन नाही. आणि मला पहिल्यापासूनच बेकिंगची आवड होती. पण लॉकडाउनमध्ये मी भरपूर नव्या रेसिपी शिकले. त्यामूळे जणू ह्या शोची रंगीत तालिम झाली होती. त्यात मला माझ्या काही पूर्वीच्या सहकलाकारांसोबतही ह्या शोमूळे स्क्रिन शेअर करायला मिळणार आहे, ह्याचा एक वेगळाच आनंद आहे.”
सोनालीने याआधी ‘कॉलेज माझी जान’, ‘गमंतगढ’, ‘आम्ही सारे खवैय्ये’, अशा टेलिव्हिजन शोजचे सुत्रसंचालन केले होते.आता सोनालीच्या चाहत्यांना दसऱ्यापासून तिला टेलिव्हिजनवर पुन्हा पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
या शोबद्दल सोनाली म्हणाली, “इतर कुकिंगविषयीच्या शोमध्ये फक्त येणारे पाहुणेच रेसिपी दाखवतात. पण इथे मात्र मीही काही पदार्थ बनवणार आहे. योगाभ्यांसामूळे शिकलेल्या काही टिप्स आणि काही किचन टिप्सही मी शेअर करणार आहे. आलेल्या पाहुण्यांसोबत माझ्या कुकिंगविषयीच्या गप्पा रंगणार आहेत. काही फुडरिलेटेड खेळही असतील. जे प्रेक्षकांना नक्कीच मनोरंजक वाटतील असे मला वाटते.”
शूटिंग अनुभवाबद्दल सोनाली म्हणते, “सतत मास्क घालण्याची सवय नसते. त्यामूळे पूर्णवेळ मास्क घालून शूटिंगस्थळी राहणं, हे थोडं दमछाक करवणारं असलं, तरीही आपल्या सुरक्षेसाठी महत्वाचं आहे, असं मला वाटतं. स्वादिष्ट जेवण बनवण्याची पहिली पायरी ही स्वच्छता आहे. त्यामुळे सेटवरचे वातावरण तसेच असते, याचा मला आनंद आहे.”