​छोटा पडदा बदलत आहे ः दिशा परमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 18:02 IST2017-01-27T12:32:01+5:302017-01-27T18:02:01+5:30

प्राजक्ता चिटणीस प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा या मालिकेद्वारे दिशा परमारने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले. पहिल्याच मालिकेत ...

The small screen is changing: Direction Parmar | ​छोटा पडदा बदलत आहे ः दिशा परमार

​छोटा पडदा बदलत आहे ः दिशा परमार

ong>प्राजक्ता चिटणीस

प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा या मालिकेद्वारे दिशा परमारने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले. पहिल्याच मालिकेत तिने साकारलेली पंखुरी ही भूमिका प्रचंड गाजली. या मालिकेनंतर तिने जवळजवळ दोन वर्षांचा ब्रेक घेतला होता आणि आता ती वो अपना सा या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने दिशाशी मारलेल्या गप्पा...

प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा या मालिकेद्वारे तू तुझ्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केलीस, अभिनयक्षेत्रात यायचे असे तू कधी ठरवलेस?
मी केवळ पाच वर्षांची असल्यापासूनच मला अभिनयक्षेत्रात यायचे होते. पण माझ्या कुटुंबीयातील कोणीच या क्षेत्रातील नसल्याने सुरुवात कशी करायची हेच मला कळत नव्हते. मॉडलिंग केल्यानंतर अभिनयक्षेत्रात करियर करू शकेन असे मला वाटत असल्याने मी कॉलेजमध्ये असताना मॉडलिंग करू लागले. दिल्लीतील एका प्रसिद्ध मॉडलिंग कंपनीसाठी मी मॉडलिंग करत होते. त्यांच्यासोबत माझा एक्सक्ल्युझिव्ह कॉन्ट्रक्ट होता. मॉडलिंग करत असतानाच मला प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा या मालिकेच्या ऑडिशनविषयी कळले आणि मी या मालिकेसाठी ऑडिशन दिले. या ऑडिशनमध्ये मी पास झाले आणि माझा अभिनयप्रवास सुरू झाला. मी मुळची दिल्लीची आहे. पण मालिका मिळाल्यानंतर मी दिल्ली सोडून अभिनयक्षेत्रात करियर करण्यासाठी मुंबईत आली.

प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा या मालिकेनंतर पुन्हा छोट्या पडद्यावर येण्यासाठी दोन वर्षांचा ब्रेक का घेतलास?
डेली सोप करत असताना दिवसातील 12-14 तास तुम्ही चित्रीकरण करत असता. प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा ही मालिका करत असताना माझा संपूर्ण दिवस हा चित्रीकरणातच जायचा. तसेच महिन्यातील कित्येक दिवस मी चित्रीकरण करत असे. त्यामुळे माझे वैयक्तिक आयुष्य काहीच उरलेच नव्हते. त्यामुळे मालिका संपल्यानंतर सहा महिने तरी आराम करायचा असे मी ठरवले होते. त्या दरम्यान मी कोणत्या ऑफरदेखील स्वीकारत नव्हते. सहा महिन्यांनंतर मी मालिकांच्या कथा वाचायला सुरुवात केली होती. एका मालिकेची कथा मला आवडल्याने मी ती मालिका मी साइनदेखील केली होती. पण काही कारणास्तव ही मालिका बनू शकली नाही आणि त्यात माझा बराचसा वेळ गेला. त्यामुळे मला छोट्या पडद्यावर परतण्यासाठी दोन वर्षांचा अवधी लागला. 

वो अपना सा या मालिकेत तुझी भूमिका काय असणार आहे?
सतत आनंदी राहाणाऱ्या एका मुलीची मी वो अपना सा या मालिकेत भूमिका साकारत आहे. माझ्या भूमिकेचे नाव जान्हवी असून प्रत्येक गोष्टीत आनंद मिळवण्याचा मी प्रयत्न करते. मी नेहमीच सगळ्यांना मदत करण्यासाठी तत्पर असते असे मालिकेत दाखवण्यात आले आहे. या मालिकेत मी साकारत असलेली जान्हवी आणि खऱ्या आयुष्यातील दिशा यांच्यात खूपच साम्य आहे. जान्हवीप्रमाणे माझ्यातदेखील खूप आत्मविश्वास आहे आणि मला तिच्याप्रमाणेच नवनवीन गोष्टी करायला आवडतात. केवळ जान्हवी खूप बोलते. मला जास्त बोलायला आवडत नाही. जान्हवी ही माझ्याचसारखी असल्याने मला ही भूमिका साकारायला अधिक मजा येत आहे. 

छोट्या पड्यावर केवळ सासू-सूनेच्या मालिका दाखवल्या जातात, असे म्हटले जाते. आजच्या मालिकांविषयी तुझे मत काय आहे?
छोट्या पडदा आता खूप बदलला आहे. वेगवेगळ्या विषयावरच्या मालिका बनवल्या जात आहेत. छोट्या पडद्यावर अनेक बदल होत असताना मी या माध्यमाचा भाग आहे याचा मला अभिमान वाटत आहे. 

Web Title: The small screen is changing: Direction Parmar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.