Shefali Jariwala Death: 'काँटा लगा' गाण्यातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवालाचं दुःखद निधन झालं. वयाच्या ४२ व्या वर्षी शेफालीने अखेरचा श्वास घेतल्याने तिच्या चाहत्यांना खूप दुःख झालं. शेफालीला हृदयविकाराचा झटका आल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शेफालीची एक्झिट अनेकांना चटका लावून गेली. अशातच शेफालीची शेवटची पोस्ट व्हायरल झाली आहे. ती पोस्ट वाचून तिचे चाहते हळहळले आहेत.
शेफाली जरीवालाची शेवटची पोस्ट
शेफाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय होती. ती विविध फोटोशूट आणि पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांचं लक्ष वेधून घ्यायची. अशातच शेफालीची काही दिवसांपूर्वींची पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये शेफाली मेकअप करताना दिसून येते. हा व्हिडीओ शेअर करुन शेफाली लिहिलं होतं की, 'आयुष्य आनंदाने जगण्याची वेळ आली आहे. सर्व काही आपल्या मनासारखं घडतंय, असं वाटतंय.' असं कॅप्शन देत शेफालीने हा व्हिडीओ शेअर केला होता. इतकंच नव्हे त्यानंतर काही दिवसांपूर्वी शेफालीने ग्लॅमरस फोटोशूट करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
चाहत्यांनी व्यक्त केलं दुःख
आयुष्याबद्दल सकारात्मक असलेल्या शेफालीचं असं अकस्मात निधन होईल, याची कोणी कल्पनाच केली नव्हती. शेफालीची शेवटची पोस्ट वाचून अनेकांनी दुःख आणि शोक व्यक्त केला आहे. अभिनेत्री, मॉडेल असलेल्या शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी अचानक निधन झाले आहे. तिला हृदयविकाराचा झटका आल्याने तिची प्रकृती खालावल्यानंतर, तिचे पती पराग त्यागी यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन विश्वात आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. तिचा मृतदेह मुंबई येथील कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवल्याचेही समजते.