हर्षदा खानविलकर पुन्हा एकदा दिसणार सासूच्या भूमिकेत, 'मुलगी पसंत आहे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 06:15 PM2024-01-06T18:15:45+5:302024-01-06T18:16:05+5:30

'मुलगी पसंत आहे' मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

Harshada Khanvilkar will once again play the role of a mother-in-law, 'Mulgi Pashta Hai' will hit the screens soon | हर्षदा खानविलकर पुन्हा एकदा दिसणार सासूच्या भूमिकेत, 'मुलगी पसंत आहे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

हर्षदा खानविलकर पुन्हा एकदा दिसणार सासूच्या भूमिकेत, 'मुलगी पसंत आहे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

भूतकाळात अशा काही वाईट गोष्टी घडतात ज्याचे पडसाद माणसांच्या मनावर आणि येणाऱ्या भविष्यातील हालचालीवर उमटतात. घडलेल्या वाईट घटना मनाला इतक्या भिडतात की अन्यायाविरुध्द आवाज उठवणं गरजेचं वाटतं. अशीच एक भयानक घटना स्वत:च्या बहिणीच्या आयुष्यात घडल्यावर कोणती बहिण शांत बसेल? नेमंक कोणाच्या बाबतीत काय घडलंय हे प्रेक्षकांना ‘मुलगी पसंत आहे’ या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ‘मुलगी पसंत आहे’ मालिका येत्या १५ जानेवारीपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

‘मुलगी पसंत आहे’ मालिका सासू आणि सून या दोन पात्रांवर जास्त भर देते. या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर सासूच्या भूमिकेत दिसणार आहे तर अभिनेत्री कल्याणी टिभे सूनेची भूमिका साकारणार आहे. अभिनेता संग्राम समेळ हा मालिकेचा प्रमुख नायक आहे. संग्राम समेळ आणि हर्षदा खानविलकर या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. 

या मालिकेची नवीन झलक सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आली. या झलकमध्ये सासू आणि सुनेचं नातं, दोघींचे स्वभाव याचा अंदाज प्रेक्षकांना आलाच असेल. सासू आणि सून दोघींचं वेगळंच नातं दिसून येत आहे. सासूचं भूतकाळातील वागणं आणि सुनेचं वर्तमानकाळातील वागणं, तसेच सून लक्ष्मीचं रूप न घेता दुर्गेचं रूप का घेऊ पाहते हे जाणून घ्यायची प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. अशी तोडीस तोड सासू -सुनेची जोडी क्वचितच बघायला मिळते. 
सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘मुलगी पसंत आहे’ या मालिकेची कथा आणि पटकथा लेखिका रोहिणी निनावे यांनी लिहिली आहे तर मृणालिनी जावळे यांनी संवाद लिहिले आहेत. संगीताची जबाबदारी निलेश मोहरीर यांनी पेलली आहे. यशोधराची सून होऊन आराध्या अन्यायाच्या विरोधात उभी राहू शकेल का?, हे जाणून घेण्यासाठी मालिका पाहावी लागेल.

Web Title: Harshada Khanvilkar will once again play the role of a mother-in-law, 'Mulgi Pashta Hai' will hit the screens soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.