बाजी मालिकेचे दिग्दर्शक संतोष कोल्हे सांगत आहेत या मालिकेच्या प्रवासाविषयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 13:07 IST2018-07-24T13:06:06+5:302018-07-24T13:07:41+5:30
पेशवाईच्या उत्तरार्धात मराठेशाही संपवण्यासाठी इंग्रजांनी निजामाशी हातमिळवणी केली होती... त्या काळाचा संदर्भ घेऊन ‘बाजी’ची काल्पनिक कथा लिहिण्यात आली आहे. त्या वेळी ‘शेरा’नावाच्या एका हेराला पेशवाईत पाठवण्यात आले होते आणि पेशव्यांना संपवण्यासाठी त्याला शंभर दिवसांची मुदत देण्यात आली होती, असे या मालिकेचे कथानक आहे.

बाजी मालिकेचे दिग्दर्शक संतोष कोल्हे सांगत आहेत या मालिकेच्या प्रवासाविषयी
झी मराठी वाहिनीवर पेशवाईचा काळ दाखवणारी ‘बाजी’ ही मालिका ३० जुलैपासून सुरू होत आहे. ही मालिका केवळ शंभर भागांचीच असणार आहे. पेशवाईच्या उत्तरार्धात मराठेशाही संपवण्यासाठी इंग्रजांनी निजामाशी हातमिळवणी केली होती... त्या काळाचा संदर्भ घेऊन ‘बाजी’ची काल्पनिक कथा लिहिण्यात आली आहे. त्या वेळी ‘शेरा’नावाच्या एका हेराला पेशवाईत पाठवण्यात आले होते आणि पेशव्यांना संपवण्यासाठी त्याला शंभर दिवसांची मुदत देण्यात आली होती, असे या मालिकेचे कथानक आहे. या मालिकेविषयी या मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते संतोष कोल्हे सांगतात, शिवाजी महाराजांपासून ते पेशव्यांपर्यंत, मराठ्यांचा इतिहास विविध पद्धतीने आपल्या समोर आला. या उज्ज्वल इतिहासाला शौर्य, साहस, धाडस यांची उज्ज्वल परंपरा आहे. या परंपरेत अनेक सुरस आणि चमत्कारिक घटना आपल्याला दिसतात. भटकंती या मालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर हिंडत असताना या गोष्टी नव्याने समोर येत होत्या. निनाद बेडेकर या इतिहासाच्या जाणकार अभ्यासकाशी संपर्क झाल्यानंतर या ऐतिहासिक वास्तवाला गूढ, अतर्क्य आणि अगम्य घटनांची जोड असल्याचे लक्षात आले. यातून एक वेगळेच कथानक निर्माण होऊ शकतं, हा आत्मविश्वास झी मराठीचे बिझिनेस हेड निलेश मयेकर यांनी दिला. काही मोजक्या सत्य घटनांचा आणि इतिहासाचा आधार घेत काल्पनिक कथानकाच्या मांडणीला सुरुवात झाली. नेहमीच्या फॅमिली ड्रामाला बाजूला ठेवून ‘बाजी’ या मालिकेच्या कथा लेखनाला सुरुवात झाली. ही मालिका करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही केली ती म्हणजे सर्व भाग आधी लिहून घेतले. त्यानंतर सिनेमाच्या पद्धतीने त्या त्या लोकेशनवर जाऊन त्याचे चित्रीकरण आम्ही केले. प्रक्षेपित होण्याआधीच मालिकेचे नव्वद टक्के चित्रीकरण आम्ही पूर्ण केले आहे.
मालिकेला सत्य घटनांची फक्त पार्श्वभूमी आहे, तरीही १७७४ चा काळ उभा करणं खूप महत्वाचं होतं. त्या काळाला अनुसरून वेशभूषा करणे हे गरजेचे होते. सातारा, सासवड, भोर, फलटण या परिसरात अजूनही पेशवाईतल्या खुणा असणारे वाडे आणि वसाहती आहेत. तिथल्या रिअल लोकेशनवर जाऊन त्यात फेरफार करून या मालिकेचे चित्रीकरण केले आहे, पण या वास्तवाला कल्पनेची झालर असल्याने या लोकेशनमध्ये योग्य ते फेरफार करणं सोपं गेलं. अॅक्शन सीन आणि स्पेशल इफेक्ट्स याचा योग्य वापर या मालिकेचे चित्रीकरण करताना आम्ही केला आहे. काळ उभा करण्याचं आवाहन होतच... पण हिरोच्या स्टंट्सना ग्राफिक्सच्या मदतीने आम्ही अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेमकथेला ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि त्यात गूढ रहस्यकथा अशी ही गोष्ट असल्याने तिच्या प्रत्येक भागाची सुरुवात आणि शेवट आम्ही नीट डिझाइन केली. चित्रीकरणाआधीच संपूर्ण गोष्ट आणि सर्व एपिसोड लिहून घेतले असल्याने हे कथानक जास्त प्रभावी झाले असून ही मालिका केवळ १०० भागांचीच आहे.