'मुलगी झाली हो' मालिकेतील ही अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबेडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 12:40 IST2021-12-02T12:39:59+5:302021-12-02T12:40:31+5:30
'मुलगी झाली हो' मालिकेतील या अभिनेत्रीच्या लग्नाची तारीख अद्याप समजलेली नाही.

'मुलगी झाली हो' मालिकेतील ही अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबेडीत
स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेत काही दिवसांपासून शौनक आणि माऊच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळाली होती. या मालिकेतील माऊ आणि शौनकचे लग्न कधी होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अखेरीस हा विवाह सोहळा महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. आता शौनक आणि माऊच्या नव्या संसारात कुठल्या कुठल्या अडचणी येतात हे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. दरम्यान असे समजते आहे की या मालिकेत आर्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री लवकरच खऱ्या आयुष्यात लग्नबेडीत अडकणार आहे.
मुलगी झाली हो या मालिकेत आर्याची भूमिका अभिनेत्री श्वेता अंबिकर हिने साकारली आहे. या मालिकेत आर्याचे पात्र साकारणारी श्वेता अंबिकर हिचे नुकतेच केळवण पार पडले आहे. त्यामुळे श्वेता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. लग्नाची तारीख तिने जाहीर केली नसली तरी तिच्या घरी लग्नाची लगबग पाहायला मिळते आहे. श्वेता अंबिकर तिचा मित्र आणि लेखक दिगदर्शक असलेल्या अमेय गोरेसोबत येत्या काही दिवसातच लग्न करणार आहे. अमेय होतकरू बालकलाकारांसाठी ट्री थिएटर अकॅडमीदेखील चालवतो. शिवाय त्याचे शिवतीर्थनगर, कोथरूड येथे केक शॉप देखील आहे.
श्वेताने मुलगी झाली हो या मालिकेव्यतिरिक्त माझे मन तुझे झाले, दुर्वा, पुढचं पाऊल, बाजी, तू माझा सांगाती, दिल दोस्ती दुनियादारी या मालिकांमधून काम केले आहे. श्वेताने पुण्यातच असताना आपले शिक्षण पूर्ण केले आहे. ललित कला केंद्रमधून तिने अभिनयाचे धडे गिरवले होते. यातूनच रंगभूमीवर तिचे पदार्पण झाले आहे. नाटकांमधून काम करत असताना माझे मन तुझे झाले या मालिकेत तिला झळकण्याची संधी मिळाली होती. भेट हा मराठी चित्रपटात तिने अभिनय केला आहे. तसेच गोंदया आला रे या लघुपटातही तिने महत्वाची भूमिका केली होती.