सूरांचे जादूगार आर. डी. बर्मन उर्फ पंचम दा यांचा स्मृतिदिन

By Admin | Updated: January 4, 2017 10:33 IST2017-01-04T10:32:11+5:302017-01-04T10:33:17+5:30

आपल्या प्रतिभेने हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीताला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे आर.डी.बर्मन यांचा आज स्मृतिदिन..

Sur wizard R. D. Memorial Day of Burman alias Pancham da | सूरांचे जादूगार आर. डी. बर्मन उर्फ पंचम दा यांचा स्मृतिदिन

सूरांचे जादूगार आर. डी. बर्मन उर्फ पंचम दा यांचा स्मृतिदिन

>प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. ४ - आपल्या प्रतिभेने हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीताला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे आर.डी.बर्मन उर्फ पंचमदा म्हणजे राहुल देव बर्मन.. या सूरांच्या जादूगाराचा आज स्मृतिदीन. २७ जून १९३९ साली जन्मलेले आर.डी.बर्मन यांनी तब्बल 300 हून अधिक सिनेमांना  संगीताचा साज चढवला. म्युझिक स्टाईल ही आर. डी. यांची  जमेची बाजू... संगीतात इतके वैविध्यपूर्ण प्रयोग करणारा संगीतकार शोधून सापडणार नाही. 
पंचमदांचं संगीताचं सखोल ज्ञान आणि त्यातून निर्माण झालेली अवीट गोडीची हजारो गाणी - जी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत- ती अक्षरशः डोळ्यांसमोर स्क्रीनसेव्हरचे कलर बदलत सरकत जावेत, तशी दिसायला लागतात.  ऱ्हिदमचा उत्तम आणि वेगळा वापर हे पंचंमदांचं वैशिष्ट्य होतं. जगभरातल्या संगीतप्रकारातले उत्तम ऱ्हिदम पॅटर्न राहुलदांनी बॉलिवुडमध्ये वापरले. 
आपल्या १९६१ ते १९९४ दरम्यानच्या कारकिर्दीमध्ये आर. डींनी ३३१ चित्रपटांना संगीत दिले व स्वत: काही गाणी देखील म्हटली. किशोर कुमार व आशा भोसले हे त्याचे विशेष आवडीचे पार्श्वगायक होते. 
 
राहुल देव बर्मन याचं मूळ आडनाव देवबर्मन. त्यांचे वडील संगीतकार सचिनदेव बर्मन हे त्रिपुरा संस्थानचे प्रिन्स. हे संगीतकार पिता-पुत्र मूळ राजघराण्यातून आलेले. पंचमच्या आई मीरादेवी या सुद्धा बंगालमधल्या एक संगीतकार. आणि सचिनदेव व मीरादेवी या सुरेल दांपत्याची सुंदर रचना म्हणजे राहुलदेव बर्मन... "वरमेको गुणी पुत्रो...‘ या पठडीतली...! 
पंचमवर लहानपणापासूनच सर्वसाधारण बंगाली घरात होतात, तसे रवींद्र संगीताचे संस्कार होत होते. वयाच्या अकराव्या वर्षापासून तो माऊथ ऑर्गनवर सतत काही ना काही वाजवू लागला. त्याचं ते वाजवणं ऐकून एक दिवस दादामुनी म्हणजे अशोककुमार म्हणाले, "अरे, ये तो पंचम सूर में बजाता है.‘‘ आणि मग दादा बर्मनांचा तो लाडका "तुबलू‘ पुढे पंचम या नावानंच ओळखला जाऊ लागला. निसर्गातल्या आविष्कारातील संगीत पंचम शोधू लागला. कडाडणारी वीज, वाऱ्याचा, लाटांचा आवाज.. रेल्वे इंजिनची शिटी.. गलबतांचे भोंगे... कुत्र्यांचं धापा टाकणं... आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वर... ताल... आणि लय शोधत पंचम मोठा झाला. सुरवातीला आपल्या वडिलांचा मुख्य सहायक म्हणून आणि नंतर स्वतंत्र संगीतकार आर. डी. बर्मन! 
 
मुंबई ते तळोजा या प्रवासात स्टेअरिंगवर बोटे वाजवता वाजवता कंपोज केलेलं 'घर आजा घिर आये बदरा सावरीया..' हे लतादिदींचं मालगुंजी रागात बांधलेलं गाणं म्हणजे पहिलीच निर्मिती आणि तीच ‘मास्टर पीस‘ असं विशेषण मिळवून गेली. या गाण्यात तबल्याचा ठेका आणि सतार व सारंगीला असलेला घुंगरांचा समन्वय.. ऐकून वाटणारही नाही, की हा कुणी नवा संगीतकार आहे म्हणून; कारण अमर्याद प्रयोगशीलता, नैसर्गिक आवाजांचा समावेश आणि र्हिदम सेक्‍शनमध्ये तालवाद्यांचा भरपूर पण सुसूत्र वापर यामुळे आरडींच्या रचना नित्यनवीन राहिल्या. 
 
पंचमला स्वतंत्र संगीतकार म्हणून पहिली संधी निर्माता, अभिनेता मेहमूद यांनी दिली. चित्रपट होता छोटे नवाब. आपल्या अंगी असलेल्या सर्व क्षमतांची सिद्धता आरडींनी या एकाच चित्रपटात वेगवेगळ्या अशा आठ गाण्यांच्या पॅकेजमध्ये दाखवून दिली आहे.
 
पंचममध्ये एक खोडकर पोरगं सतत असायचं. तो त्याला विविध प्रयोग करण्यापासून कधी दूर ठेवत नव्हता. तबल्यावर हातोडी घासून एक विचित्र साऊंड क्रिएट करून पंचमदांनी तो एका विनोदी गाण्यात वापरला. अर्थात, हा प्रयोग होता आपला लाडका दोस्त मेहमूद याच्यासाठी आणि त्यानेच गायलेल्या गाण्यासाठी. मेहमूदबरोबर खास दक्षिण भारतीय आवाजातले हेल देत हे गाणं गायलंय आपल्या आशाताईंनी. मुत्तूकुडी कव्वाडी हडा.. (दो फूल) हे ते गाजलेलं गाणं. 
 
पंचमदांनी इंडस्ट्रीला बरीच वाद्यं दिली.. जसं स्पॅनिश गिटार, मादल, फ्लेंजर इत्यादी. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा आणून वापरायचं आणि इतर संगीतकारांनी त्याचा वापर आपापल्या संगीतात नंतर करायचा असा पायंडाच त्या काळी पडून गेला होता. बेस गिटार हे असंच त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं वाद्य. भारतात बेस गिटारचा वापर असलेलं पहिलं गाणं पंचमदांनी बनवलं. १९७० ची तरुण पिढी धुंदावून सोडलेलं ते गाणं होतं, गुलाबी आँखें जो तेरी देखी (दि ट्रेन). 
 
 
नेपाळी मादल हे असंच पंचमप्रिय वाद्य. ते प्रथम वापरलं त्यांनी आपल्या वडिलांच्या संगीत संयोजनाखाली म्हणजे ‘ज्वेलथीफ‘मधल्या होटों पे ऐसी बात या गाण्यात. या गाण्याचं संपूर्ण ऑर्केस्ट्रेशन पंचमचं. मादल काही काळ उपलब्ध झालं नव्हतं म्हणून या गाण्याचं रेकॉर्डिंगसुद्धा पंचमनं स्थगित केलं होतं. याच मादलचा भरपूर वापर पंचमदांनी पुढं आपल्या बऱ्याच गाण्यांत केला. ‘अजनबी‘ चित्रपटातल्या*हम दोनों दो प्रेमी*च्या रेकॉर्डिंगच्या दरम्यान इंडस्ट्रीमधल्या वादकांचा संप होता; पण गाणं रेकॉर्ड करण्याची खुमखुमी आरडींना गप्प बसू देईना. त्यांनी मग आपले प्रमुख चार सहायक घेऊन गाणं पूर्ण केलं. नीट ऐकलं तर आपल्या लक्षात येईल, की या गाण्यात ऑर्केस्ट्रेशन नाहीच मुळी. स्वतःच्या संग्रहात रेकॉर्ड करून ठेवलेला रेल्वे इंजिनचा इफेक्‍ट, मादलचा सलग ताल, बासरी, शिटी आणि इंटरल्यूड म्युझिक म्हणून त्या चौघांचा कोरस, भूपेंद्रचा आलाप, आणि किशोर-लताचा मेन व्हॉईस.. बस्‌ गाणं पूर्ण. मादल किती सुरेख वाजू शकतो, याची ही एक देखणी प्रचिती होती...
 
१९६१ पासून म्हणजे वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षापासून स्वतंत्र संगीतकार म्हणून सुरू झालेला हा झंझावात शेवटपर्यंत म्हणजे ४ जानेवारी १९९४ अखेर ताला-सुरांच्या आभाळात मस्त गिरक्‍या घेत जगला. 
आर.डी. बर्मन यांच्याविषयीची पुस्तके
आर. डी. बर्मन - जीवन संगीत (मूळ इंग्रजी, लेखक अनिरुध भट्टाचार्य व बालाजी विठ्ठल; मराठी अनुवाद मुकेश माचकर) - राष्ट्रीय पुरस्कार विजेते पुस्तक
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया 

Web Title: Sur wizard R. D. Memorial Day of Burman alias Pancham da

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.