सुधा चंद्रन यांचे वडिल के. डी. चंद्रन यांचे निधन, अनेक चित्रपटांत केले होते काम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 02:45 PM2021-05-16T14:45:17+5:302021-05-16T14:46:22+5:30
के.डी. यांनी अनेक सिनेमांत काम केले होते. केडी यांच्या वाट्याला छोट्या भूमिका आल्यात. पण या भूमिकांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.
अभिनेत्री व नृत्यांगणा सुधा चंद्रन (Sudha Chandran) यांचे वडिल केडी चंद्रन यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने नुकतेच निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. केडी दीर्घकाळापासून आजारी होते. मुंबईतील जुहूस्थित क्रिटीकेअर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांनी अंतिम श्वास घेतला. (Sudha Chandran father AND veteran actorK D Chandran passes away )
‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत सुधा चंद्रन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
माझे वडिल आजारी होते़ त्यांना डिमेंशिया (एकप्रकारचा स्मृतीभ्रंश) होता. बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली, असे सुधा यांनी सांगितले.
केडी यांनी अनेक सिनेमांत काम केले होते. कोई मिल गया, चायना गेट, कॉल, हम है राही प्यार के, तेरे मेरे सपने, जुनून, हर दिल जो प्यार करेगा, शरारत, मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूं अशा अनेक सिनेमांत ते झळकले. केडी यांच्या वाट्याला छोट्या भूमिका आल्यात. पण या भूमिकांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.
त्यांची लेक सुधा चंद्रन यांनी नृत्य आणि अभिनयाच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. सुधा यांनी वयाच्या तिस-या वर्षांपासून नृत्य शिकायला सुरुवात केली. पण 1981मध्ये वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांना अपघात झाला, व त्यात त्यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला होता़ परंतु जिद्द न सोडता त्यांनी ‘जयपूर फूट’ लावून घेतला व नव्या उमेदीने नृत्य करण्यास सुरुवात केली. नृत्याबरोबरच अभिनेत्री म्हणून त्या नावारूपाला आल्या.