स्टंटबाजी आणि मसालापटाचा तडका!

By Admin | Updated: January 23, 2016 02:26 IST2016-01-23T02:26:15+5:302016-01-23T02:26:15+5:30

अंकुश चौधरी या अभिनेत्याचा स्वत:चा असा एक अंदाज आहे आणि त्यानुसार तो चित्रपटात त्याची अदाकारी पेश करतो. ‘गुरू’ हा चित्रपटही त्याला अपवाद नाही.

Stuntsing and Toss of Spices! | स्टंटबाजी आणि मसालापटाचा तडका!

स्टंटबाजी आणि मसालापटाचा तडका!

अंकुश चौधरी या अभिनेत्याचा स्वत:चा असा एक अंदाज आहे आणि त्यानुसार तो चित्रपटात त्याची अदाकारी पेश करतो. ‘गुरू’ हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. मराठीतला अँग्री यंग मॅन अशी त्याची इमेज निर्माण करणाऱ्या या चित्रपटात त्याने धडाकेबाज भूमिका साकारत ठसा उमटवला आहे. या चित्रपटाची कथा त्याच्यातला हा गुण अधोरेखित करणारी आहे. परिणामी, हा ‘गुरू’ म्हणजे स्टंटबाजीने युक्त असा मसालापट झाला आहे.
हिंदी किंवा दक्षिणात्य बाजाची ही कथा तशाच पद्धतीने पडद्यावर मांडली आहे. गुरू हा शहरात अनेक ‘झोल’ करत कमाई करण्याचा उद्योग करत असतो. पण एका घटनेमुळे त्याला त्याच्या गावाला जाणे भाग पडते. तिथे त्याची ओळख ओवी या तरुणीशी होते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. या गावात गुरूचा भाऊ माधव आणि त्याचे कुटुंब राहात असते. गावातला स्थानिक आमदार मानसिंग हा गावकऱ्यांची पिळवणूक करत असतो. माधवचा त्याविरुद्ध लढा सुरूच असतो. गुरूला हे सगळे कळल्यावर तो माधवच्या आणि गावकऱ्यांच्या पाठीशी उभा राहतो. त्याच्या स्टाईलने तो या लढ्याचे आव्हान स्वीकारतो.
संजय जाधव या दिग्दर्शकाने निव्वळ मनोरंजन हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून हा चित्रपट केला आहे. साहजिकच, त्यासाठी त्यात भरपूर मसाला ओतला आहे. चित्रपटात प्रेम, संवेदना, लढा अशा सगळ्या गोष्टींची पेरणी केली आहे. यातल्या नायकाला जेवढे फूटेज आहे; तितकेच महत्त्व खलनायकाला दिले आहे. त्यामुळे त्यांची झुंज चित्रपटात जोरात आहे. स्टंटबाजी हा या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे आणि ही स्टंटबाजी मजबूत रंगली आहे. चित्रपटातल्या काही गोष्टी न पटणाऱ्या असल्या तरी एकूणच चित्रपटाची मांडणी लक्षात घेता त्यावर पडदा पडला आहे. या सगळ्या मसाल्याची चव चांगली आहे; मात्र डोके न चालवता ही चव घेणेही तितकेच गरजेचे आहे. आशिष पाथरेची पटकथा व संवाद चित्रपटाच्या बाजाला साजेसे आहेत. पंकज पडघन व अमितराज यांचे संगीत दमदार वाजले आहे.
गुरूच्या भूमिकेत अंकुश चौधरीने धमाल आणि कमाल केली आहे. ‘हीरो’ म्हणवून घेण्यासाठी जे जे लागते, ते ते त्याने यात उतरवले आहे. अंकुशच्या दमदार भूमिकेसाठी हा गुरू लक्षात राहणारा आहे. ऊर्मिला कानेटकरने यात ओवी साकारत अंकुशला चांगली साथ दिली आहे. या दोघांची जोडी मस्त जमली आहे. मुरली शर्मा यांचा खलनायकही तेवढाच ताकदीचा झाला आहे. त्यांची ही भूमिका थेट अंगावर येते. अविनाश नारकर, रवींद्र मंकणी, स्नेहा रायकर आदी कलाकारांची योग्य साथ या मंडळीना मिळाली आहे. थोडक्यात, डोक्याला ताप न देता करमणुकीची हमी देणारा हा चित्रपट आहे, असे म्हणावे लागेल.

Web Title: Stuntsing and Toss of Spices!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.