एका जिद्दीची चित्तरकथा
By Admin | Updated: August 21, 2015 23:18 IST2015-08-21T23:18:34+5:302015-08-21T23:18:34+5:30
‘मांझी - द माऊंटन मॅन’ एका ध्येयवेड्या माणसाच्या पराक्रमाची गाथा आहे. ठाम निश्चय असेल तर सर्वसाधारण व्यक्तीही आपले कर्तृत्व सिद्ध करू शकते. दिग्दर्शक केतन मेहता

एका जिद्दीची चित्तरकथा
‘मांझी - द माऊंटन मॅन’ एका ध्येयवेड्या माणसाच्या पराक्रमाची गाथा आहे. ठाम निश्चय असेल तर सर्वसाधारण व्यक्तीही आपले कर्तृत्व सिद्ध करू शकते. दिग्दर्शक केतन मेहता यांचा हा चित्रपट बिहारमधील गया जिल्ह्यातील दशरथ मांझीच्या अजोड पराक्रमावर आधारित आहे. ज्याने छिन्नी आणि हाथोड्याने डोंगर फोडून गावासाठी रस्ता तयार केला. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट व्यावसायिक श्रेणीत बसत नसला तरी प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे आणि हेच या चित्रपटाचे यश आहे.
दशरथ मांझीचे (नवाजुद्दीन सिद्दिकी) गाव डोंगराने घेरलेले असते. परिणामी, गावात विकासगंगा पोहोचत नाही. याच डोंगरामुळे त्याच्या पत्नीचा (राधिका आपटे) वेळेवर इस्पितळात न नेता आल्याने मृत्यू होतो. या दु:खातून सावरत तो गावकऱ्यांसाठी डोंगर फोडून रस्ता तयार करण्याचा ठाम निश्चय करतो. गावकरी त्याला वेड्यात काढतात. ऊन-पावसाची पर्वा न करता सलग २२ वर्षे कठोर परिश्रम घेत अखेर तो रस्ता तयार करण्यात यशस्वी होतो.
मात्र सरपंच त्याच्या नावाने भ्रष्टाचार करतो.
वैशिष्ट्य : सलग २२ वर्षे कठोर मेहनत घेत डोंगर फोडून रस्ता तयार करण्याची त्याची जिद्द रुपेरी पडद्यावर कथेच्या रूपात साकार करण्यात आली आहे.
नवाजुद्दीन सिद्दिकीला दशरथ मांझीची भूमिका देऊन केतन मेहताने या चित्रपटाला नवा आयाम दिला आहे. मोठमोठे कलाकार आहेत; परंतु, नवाजुद्दीनसारखे फार थोडेच आहेत. हे सांगण्यास आडपडदा कशासाठी घ्यायचा. नवाजुद्दीनचा आजवरचा हा सर्वांत उत्कृष्ट चित्रपट म्हणावा लागेल. ही आव्हानात्मक भूमिका त्याने मोठ्या मेहनतीने वठविली. मांझीच्या पत्नीची भूमिका राधिका आपटेनेही तेवढ्याच क्षमतेने निभावली आहे.
तिग्मांशु धुलिया (सरपंच), गौरव द्विवेदी यांचे काम नजरेत भरणारे आहे. चित्रपटातील संवाद प्रभावी आहेत. दिग्दर्शक म्हणून केतन मेहता एका पराक्रमी माणसाची कथा पडद्यावर साकार करण्यात यशस्वी ठरले आहेत.
हा चित्रपट पाहणारा प्रत्येक जण मांझीच्या स्टाईलमध्ये... शानदार, जबरदस्त... जिंदाबाद.. असे जरुर म्हणेल!