चांगल्या चित्रपटासाठी सशक्त कथा आवश्यक

By Admin | Updated: March 18, 2016 01:25 IST2016-03-18T01:25:02+5:302016-03-18T01:25:02+5:30

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे अशोक सराफ हे नाव बॉलीवूडमध्येदेखील तितक्याच ताकदीचे आहे. बॉलीवूडचा एक्का असणारा दिग्दर्शक करण

Strong story requires good movie | चांगल्या चित्रपटासाठी सशक्त कथा आवश्यक

चांगल्या चित्रपटासाठी सशक्त कथा आवश्यक

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे अशोक सराफ हे नाव बॉलीवूडमध्येदेखील तितक्याच ताकदीचे आहे. बॉलीवूडचा एक्का असणारा दिग्दर्शक करण जोहर यांच्या १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘करण-अर्जुन’ या चित्रपटात अशोक सराफ यांची असलेली मुन्शीजीची भूमिका ही अविस्मरणीय आहे. मराठीमध्ये सुरुवातीला खलनायक साकारत, नंतर विनोदी बाजाकडे वळत बिन कामाचा नवरा, अशी ही बनवाबनवी, सगळीकडे बोंबाबोंब, बाप रे बाप, दोन्ही घरचा पाहुणा, आयत्या घरात घरोबा, वाजवा रे वाजवा, घनचक्कर, माझा पती करोडपती, फेकाफेकी असे एक से एक चित्रपट अशोक सराफ यांनी दिले. मराठीमध्ये २५०पेक्षा जास्त चित्रपट या दिग्गज कलाकाराने केले आहेत. येस बॉस, सिंघम अशा हिट हिंदी चित्रपटांतूनदेखील त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. मराठी, हिंदी मालिकांमध्येही त्यांच्या नावाचा दबदबा राहिला आहे. सुहृदांकडून मामा असे संबोधित केले जाणारे अशोक सराफ ‘लोकमत सीएनएक्स सेलीब्रिटी रिपोर्टर’ म्हणून संवाद साधत आहेत.

1) एकाच आठवड्यात चार ते पाच चित्रपट प्रदर्शित होतात; पण यापैकी सगळेच चित्रपट चालतात असे नाही. एखाद्या चित्रपटाची कथा पॉवरफुल असेल, तर तो बॉक्स आॅफिसवर यश मिळवितो. नुसताच बक्कळ पैसा आहे म्हणून चित्रपट काढणे योग्य नाही. त्यासाठी सशक्त कथादेखील असली पाहिजे. ती प्रेक्षकांनादेखील आवडेल, याचा विचार करणेदेखील आवश्यक आहे. कारण, आजचा प्रेक्षक वर्ग हा फार चोखंदळ झाला आहे.

2) मराठी चित्रपटांचे यश पाहता इंडस्ट्री बदलत आहे. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत चांगले विषय व कथा तेवढ्या ताकदीने समोर येत आहे. सामाजिक, राजकीय, मनोरंजनात्मक असे सगळ्याच विषयांवर अनेक चित्रपट निर्माण होत आहेत. वेगवेगळ्या व्हरायटी समोर येत आहेत. प्रेक्षकदेखील आपल्याला आवडेल व पटेल अशाच चित्रपटांना पसंती देत आहे. मराठी प्रेक्षक हे एखादा बिग बजेट हिंंदी चित्रपट आवडला, तर थिएटरमध्ये जाऊन दोन किंवा तीन वेळा पाहतील; पण मराठी चित्रपट हा आवडला तरी एकदाच पाहतात. बॉलीवूडच्या तुलनेत जर मराठी प्रेक्षकांच्या आकडेवारीबाबत तुलना केली तर ते शक्य नाही. कारण, बॉलीवूडचा प्रेक्षकवर्ग हा फार मोठा आहे, तर मराठी प्रेक्षकवर्ग हा मर्यादित आहे.

3) ग्रामीण भागात पहिल्यापासून थिएटरची संख्या नसल्यामुळे तेथील प्रेक्षकांना चित्रपट जरी पाहता आले नाहीत, तरी त्यांच्यासाठी मनोरंजनाची अनेक साधने आहेत. टीव्ही, कॉम्प्युटर, रेडिओ या माध्यमातून हा प्रेक्षकवर्ग आपले मनोरंजन करून घेत असतो; पण जरी मराठी चित्रपट थिएटर्सला लागलेच, तर तेथील प्रेक्षकाला तिकीट दर परवडण्यासारखा असेल का, या गोष्टीचादेखील विचार केला पाहिजे. मराठी प्रेक्षक हा तितका श्रीमंत नाही की, दर शुक्रवारी जाऊन मराठी चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो. हा प्रेक्षकवर्ग या शुक्रवारी मराठी चित्रपट पाहील; पण पुढच्या आठवड्यात पाहीलच याची गॅरंटी नाही.

4) चित्रपटाची प्रसिद्धी ही कायम प्रमोशनवर अवलंबून नसते. उलट हा प्रमोशनचा फंडा बॉलीवूडवाल्यांकडून आलेला प्रकार आहे. प्रमोशन करणे ही एक स्टाइल झाली आहे; पण प्रेक्षकवर्ग अशा कोणत्याही स्टाइलला बळी न पडता त्याला आवडेल तोच चित्रपट पाहतात, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सामाजिक, राजकीय, मनोरंजनात्मक, कॉमेडी यामध्ये कायम प्रेक्षकवर्ग हा विभागला जात नाही. प्रेक्षक त्यांना आवडेल त्याच पद्धतीचा चित्रपट पाहतात. जर नाटक आणि चित्रपट म्हणाल, तर नक्कीच या दोघांचा प्रेक्षकवर्ग हा पूर्णपणे वेगळा आहे. नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकवर्गाची संख्याही तितकीच वाढत चालली आहे.

- Celebrity Reporter : Ashok Saraf
शब्दांकन : बेनझीर जमादार

Web Title: Strong story requires good movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.