स्टार किड्सचे ‘फर्स्ट बर्थडे सेलिब्रेशन’!

By Admin | Updated: June 3, 2017 06:00 IST2017-06-03T05:53:10+5:302017-06-03T06:00:56+5:30

सेलिब्रिटी मंडळी आणि त्यांच्या मुलांमध्ये वेगळं नातं असतं. आपल्या मुलांबद्दल जिव्हाळा, प्रेम आणि आपुलकी या मंडळींमध्ये पाहायला

Star Kids' First Birthday Celebration! | स्टार किड्सचे ‘फर्स्ट बर्थडे सेलिब्रेशन’!

स्टार किड्सचे ‘फर्स्ट बर्थडे सेलिब्रेशन’!

 - Suvarna Jain -
सेलिब्रिटी मंडळी आणि त्यांच्या मुलांमध्ये वेगळं नातं असतं. आपल्या मुलांबद्दल जिव्हाळा, प्रेम आणि आपुलकी या मंडळींमध्ये पाहायला मिळते. बाळाच्या जन्मापासून त्याच्या प्रत्येक गोष्टी आपल्या फॅन्ससोबत शेअर करायला या मंडळींना आवडतात. विशेषत: आपल्या बाळाचा जन्म आणि वाढदिवसाचं सेलिब्रेशन याबाबत सेलिब्रिटी बरेच भावुक आणि तितकेच आनंदी अन् उत्साही असतात. त्यात आपल्या लाडक्या बाळाचा पहिला वाढदिवस असेल, तर या सेलिब्रिटींच्या आनंदालाही पारावर उरत नाही. याची प्रचिती नुकतीच आली.

रोहितची गोजिरी ‘सायशा’...
स्वप्निलप्रमाणेच अभिनेता रोहित खुराणा याच्यासाठीही त्याची लाडकी लेक स्पेशल आहे. वर्षभराआधी ६ एप्रिल रोजी रोहित आणि नेहा यांच्या आयुष्यात एका गोंडस परीचं आगमन झालं. लाडानं त्यांनी तिचं नाव ‘सायशा’ असं ठेवलं. सायशाचा पहिला वाढदिवस रोहित आणि नेहाने मोठ्या उत्साहात तसेच जल्लोषात साजरा केला. आपल्या लाडक्या लेकीचे म्हणजेच सायशाचे फोटो रोहित आणि नेहाने सोशल मीडियावर शेअर केले होते. आपल्या लाडक्या परीवर असलेले प्रेम त्यांनी सोशल मीडियावरही व्यक्त केले होते.

स्वप्निलची लाडकी लेक ‘मायरा’...

नुकताच प्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशीने आपल्या लेकीचा पहिला वाढदिवस उत्साहात आणि आनंदात साजरा केला. स्वप्निलची लाडकी लेक मायरा आता एक वर्षाची झाली. मायरा स्वप्निलच्या जीवनात आनंद घेऊन आली आहे. वर्षभराआधी २३ मे रोजी मायराचे स्वप्निलच्या कुटुंबात आगमन झाले. आपल्या गोड कुटुंबात नवा पाहुणा येणार हे कळल्यापासूनच स्वप्निल आणि त्याचे कुटुंबीय आनंदी होते आणि नव्या पाहुण्याची आतुरतेने वाट पाहत होते. त्यानंतर तो दिवस आला आणि गोड परी स्वप्निलच्या आयुष्यात आली. तिच्या येण्याने जणू स्वप्निलचे जीवन पालटले. आपल्या लाडक्या लेकीसाठी त्याने पुढील काही महिने सिनेमाचं शुटिंगसुद्धा केलं नाही. इतकंच नाही तर शुटिंगसोबतच महत्त्वाच्या बैठकाही त्यानं रद्द केल्या. आपला सारा वेळ आपल्या लाडक्या परी मायरासाठी असावा असं त्याला वाटत होतं. मायराचं बालपण स्वप्निल खूप खूप एन्जॉय करत आहे. तिच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट तो आपल्या फॅन्सशी आणि मित्रपरिवार, नातेवाइकांशी शेअर करत आहे. तिच्याशी खेळणं, मायराचं घरात रांगणं, तिचे ते बोबडे बोल, तिला लाडानं भरवणं अशा सगळ्या गोष्टी त्यानं शेअर केल्या. हे सगळं करता करता आणि बघता बघता वर्ष कधी सरलं हे खुद्द स्वप्निललाही कळलं नाही. त्यामुळेच तिचा पहिला वाढदिवस स्वप्निलसाठी थोडा खास होता. स्वप्निलनं तिच्या वाढदिवसाचं खास प्लॅनिंग केलं होतं. स्वप्निलची लाडकी परी असलेल्या मायराला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी स्वप्निलच्या कुटुंबीयांसह, नातेवाईक आणि मित्रांनी आवर्जून हजेरी लावली होती. दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे, माधवी निमकर, समिधा गुरु, अभिजित गुरुसह चित्रपटसृष्टीतील त्याच्या मित्रांनी यावेळी उपस्थिती लावली. मायराच्या पहिल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो स्वप्निलने त्याच्या चाहत्यांसाठी सोशलमीडियावर शेअर केलेत. वाढदिवसाचा दिवस निघून गेला असला, तरी या फोटोंच्या माध्यमातून स्वप्निलच्या फॅन्सकडून मायरावर शुभेच्छांचा वर्षाव सुरूच राहील. यावर स्वप्निलनेही फॅन्सना धन्यवाद म्हटले आहे. मायराने तुम्हा साऱ्यांना थँक्यू म्हटलं आहे. ‘आशीर्वाद तसंच प्रेम सदैव पाठीशी राहू द्या’ अशी पोस्टही त्याने शेअर केली आहे.

Web Title: Star Kids' First Birthday Celebration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.