चमचमत्या ताऱ्याचा संगीतमय वर्षाव

By Admin | Updated: January 30, 2015 23:12 IST2015-01-30T23:12:07+5:302015-01-30T23:12:07+5:30

कटेवरी हात ठेवून वर्षानुवर्षे त्याच स्थितीत दर्शन देणाऱ्या बा विठ्ठलाने उभे राहण्यासाठी साधी वीट पायाखाली घेतली आणि कायम वसुंधरेशी घट्ट नाते जोडले.

Sparkling muscular showers | चमचमत्या ताऱ्याचा संगीतमय वर्षाव

चमचमत्या ताऱ्याचा संगीतमय वर्षाव

मराठी चित्रपट,राज चिंचणकर

कटेवरी हात ठेवून वर्षानुवर्षे त्याच स्थितीत दर्शन देणाऱ्या बा विठ्ठलाने उभे राहण्यासाठी साधी वीट पायाखाली घेतली आणि कायम वसुंधरेशी घट्ट नाते जोडले. त्याची गळाभेट घेणाऱ्यांनी आणि त्याच्या पायाशी लोटांगण घालणाऱ्यांनीही हा साधेपणा जपला व ते स्वत:च माउली झाले. ही झाली तशी मागची गोष्ट; पण हात आभाळाला टेकले तरी पाय जमिनीवरच असू द्यावेत, अशी वचने थोरामोठ्यांच्या मुखातून आजही बाहेर पडतात. अगदी याच विचारांची आठवण ‘एक तारा’ हा चित्रपट करून देतो आणि हे करताना नादमय संगीताच्या तालावर ठेका धरायला लावतो. पाठीराख्या माउलीच्या अस्तित्वाने भारून टाकत, मनाला भिडणाऱ्या संगीत साथीने हा तारा सूरमयी वर्षाव करतो.
गावाला विठ्ठलाच्या मंदिरात कीर्तन करणारा ज्ञानेश्वर ऊर्फ माउली गावकऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे शहरात एका चॅनेलने आयोजित केलेल्या म्युझिक शोमध्ये गाण्यासाठी येतो. तिथल्या झगमगाटाने तो बावचळून जातो. अशा वेळी त्याला त्या शोची समत्वयक ऊर्जा धीर देते आणि विठ्ठलाचे नाव घेऊन ज्ञानेश्वर स्पर्धेला सामोरे जातो.
इथून फ्लॅशबॅकने त्याचे आयुष्य चित्रपट मांडतो. माउलीची भीड चेपावी म्हणून त्याची बायको चतुरा व मित्र विठूसुद्धा शहरात येतात. स्वत:च्या हिमतीवर माउली यशाच्या एकएक पायऱ्या चढत जातो.
या प्रवाहात ऊर्जा त्याच्याकडे आकृ ष्ट होते. ही जवळीक त्याच्या वैवाहिक जीवनावर परिणाम करते आणि विठू चतुराला गावाला घेऊन जातो. अमाप पैसा आणि प्रसिद्धीच्या मायाजालात ज्ञानेश्वर पुरता वाहत जातो आणि त्याच्या डोक्यावर गर्व स्वार होतो. गर्वाचे घर अर्थातच खाली या उक्तीनुसार चित्रपट पुढे ज्ञानेश्वरचा प्रवास पडद्यावर मांडतो.
यश अंगात भिनत गेले आणि त्याची हवा डोक्यात गेली की हेच यश वाकुल्या दाखवते, या धारणेवर सचिन दरेकरने लिहिलेली कथा-पटकथा ठसठशीत आहे. तिला अवधूत गुप्ते यांनी दिग्दर्शकीय चाँद लावत हा तारा लीलया चमकवला आहे. संगीत हा या चित्रपटाचा आत्मा आहे आणि ते खुलवण्याची सार्थ कामगिरी अवधूत गुप्ते यांनी पार पाडली आहे. तंत्रज्ञानाच्या उत्तम साथीने हा चित्रपट ‘दिसण्यात’ कुठेही कमी पडलेला नाही. यातली गाणी ताल धरायला लावणारी असून ओठांवर खेळणारी आहेत. चित्रपटातली प्रसंगांची पेरणी चांगली आहे, मात्र यातला भाईगिरीचा प्रसंग चित्रपटाला नाहक वेगळ्या ट्रॅकवर घेऊन जातो. चित्रपटाची लांबीही अधिक असल्याचे जाणवत राहते.
ज्याच्या जीवनावर हा ‘एक तारा’ चमकला आहे त्या संतोष जुवेकरने प्रमुख भूमिका रंगवताना जीव ओतला आहे. वारकरी ते रॉकस्टार अशा त्याच्या प्रवासाचा आलेख चढता राहिला आहे. ऊर्जाची भूमिका तेजस्विनी पंडितने भन्नाट कॅ री केली आहे. ऊर्मिला निंबाळकर हिने रंगवलेली चतुरा लाजवाब आहे. सागर कारंडेचा विठू लक्षात राहतो. एकंदरीत हा ‘एक तारा’ म्हणजे चांगल्या गोष्टीसह मिळणारी संगीताची दर्जेदार मेजवानी असून, आत्मा आणि कलात्मकतेचा आनंदमयी मिलाफ आहे.

Web Title: Sparkling muscular showers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.