स्मिता ठाकरे काढताहेत बाळासाहेबांवर सिनेमा
By Admin | Updated: August 20, 2015 09:21 IST2015-08-20T01:56:43+5:302015-08-20T09:21:53+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर ‘साहेब’ हा चित्रपट येतोय. बाळासाहेब हे देशातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक होते. त्यामुळे त्यांच्याभोवती कायमच एक वलय होतं

स्मिता ठाकरे काढताहेत बाळासाहेबांवर सिनेमा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर ‘साहेब’ हा चित्रपट येतोय. बाळासाहेब हे देशातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक होते. त्यामुळे त्यांच्याभोवती कायमच एक वलय होतं. त्यांची स्नुषा स्मिता ठाकरे त्यांच्यावरील सिनेमा निर्मित करत आहे, असं वृत्त आहे.
त्यांच्या दोन मुलांपैकी ज्येष्ठ पुत्र राहुल ठाकरेनं कॅनडातून चित्रपटविषयक कोर्स पूर्ण केलाय. त्यानं राजू हिराणीच्या सुपरहिट ‘पीके’ सिनेमात हिराणींचा साहाय्यक म्हणूनही काम केलंय. राहुलसाठी काही विशेष करावं असं बाळासाहेबांना नेहमीच वाटायचं.
आता राहुल आपल्या आजोबांवरचा आपला पहिलाच चित्रपट दिग्दर्शित करून, या क्षेत्रात पदार्पण करत आहे. बाळासाहेबांना पूजनीय मानणाऱ्या त्यांच्या स्नुषा स्मितातार्इंशी या चित्रपटासंदर्भात ‘सीएनएक्स’ने साधलेला हा संवाद...
बाळासाहेबांवरील चित्रपट-चरित्रपटाबाबत त्यांच्याशी तुम्ही कधी बोलला होता काय?
स्मिता : होय. सुरुवातीला मला त्यांच्यावर पुस्तक लिहायचं होतं. साहेब हयात असतानाच खरं तर मला हा चित्रपट करायचा होता. त्यांच्यावर सिनेमा बनवण्याच्या विषयानं मला झपाटलंय, याची जाणीव साहेबांना होती. ते म्हणायचे, ‘मी आपला बोलत राहीन, त्यातून तुला उपयोगी अशा नोंदी तू घेत जा.’
या चित्रपटासाठी तुमचा मुलगा राहुलची दिग्दर्शक म्हणून निवड का करावीशी वाटली?
राहुलला दिग्दर्शक म्हणून पाहायची साहेबांचीच इच्छा होती. बाळासाहेबांवरील चित्रपटाचं दिग्दर्शन करायला, कोणत्या दिग्दर्शकाला आवडणार नाही. त्यांचं व्यक्तिगत-सार्वजनिक जीवन त्यानंही अनुभवलंय. त्यामुळं राहुलच या चित्रपटाला न्याय देईल, असा
विश्वास आहे.
अवघं जग त्यांना ‘बाळासाहेब’ म्हणून ओळखत होतं. ठाकरे कुटुंबाचा तुम्ही एक घटक आहात, तुम्ही त्यांना कोणतं संबोधन
वापरत होता?
घरात आम्ही त्यांना ‘साहेब’ संबोधत होतो. त्यांची नातवंडं त्यांना आज्जा म्हणत असत. ते घरात पूर्णपणे कुटुंबवत्सल व्यक्ती होते. आमच्याशी ते कधीच कडकपणे वागले नाहीत.
एक माणूस म्हणून बाळासाहेबांचा तुम्हाला भावलेला सर्वांत चांगला गुण कोणता?
बाळासाहेबांची निरीक्षणक्षमता जबरदस्त होती. मी परिधान केलेले कपडे मॅच होणारे नसले वा ते माझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे नसल्यास एका क्षणात त्यांच्या लक्षात यायचे. त्यानंतर ‘बरोबर नाही’ एवढीच प्रतिक्रिया आपल्या खास शैलीत ते द्यायचे.