Silence 2 Movie Review: उत्कंठावर्धक कथानकाला मनोजच्या दमदार अभिनयाची साथ

By संजय घावरे | Published: April 16, 2024 08:28 PM2024-04-16T20:28:17+5:302024-04-16T20:30:21+5:30

२०२१ मध्ये रिलीज झालेल्या 'सायलेन्स' या हिंदी चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. दिग्दर्शक अबन देवहंस यांनी द नाईट आऊल बार शूटआउटचा उलगडा या चित्रपटात केला आहे.

Silence 2 Movie Review: Manoj's powerful performance complements the thrilling storyline | Silence 2 Movie Review: उत्कंठावर्धक कथानकाला मनोजच्या दमदार अभिनयाची साथ

Silence 2 Movie Review: उत्कंठावर्धक कथानकाला मनोजच्या दमदार अभिनयाची साथ

Release Date: April 16,2024Language: हिंदी
Cast: मनोज बाजपेयी, प्राची देसाई, साहिल वैद, वकार शेख, अनिकेत भारद्वाज, श्रुती बापना, सुरभी रोहरा, पारुल गुलाटी
Producer: किरण देवहंसDirector: अबान भरूचा देवहंस
Duration: २ तास २२ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

२०२१मध्ये रिलीज झालेल्या 'सायलेन्स' (Silence Movie) या हिंदी चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. दिग्दर्शक अबन देवहंस यांनी द नाईट आऊल बार शूटआउटचा उलगडा या चित्रपटात केला आहे. पुन्हा एकदा 'कुछ तो गडबड है' असं म्हणत स्पेशल क्राईम युनिटचे एसीपी अविनाश वर्माच्या रूपातील मनोज बाजपेयीने आपल्या अभिनयाची मोहिनी घातली आहे. 

कथानक : एका रात्री द नाईट आऊल बारमध्ये गोळीबार होतो. मंत्र्यांचे सचिव आणि एका पत्रकाराची हत्या झाल्याने या शूटआऊटला अतिशय महत्त्व प्राप्त होतं आणि ही केस एसीपी अविनाश वर्मांकडे येते. अविनाश आपल्या शैलीत टिमसोबत केस सोडवत असताना त्याला काही असे पैलू सापडतात ज्याचे धागेदोरे मानवी तस्करी करणाऱ्या एका मोठ्या स्कँडलशी जोडलेले असतात. बारमधील गोळीबार मंत्र्यांचे सचिव आणि पत्रकाराला मारण्यासाठी नसून, एका अनामिक मुलीच्या हत्येसाठी असल्याची जाणीव झाल्यावर या केसला एक वेगळीच दिशा मिळते.

लेखन-दिग्दर्शन : आजवर मानवी तस्करीवर बरेच चित्रपट बनले असले तरी यात मांडलेले काही पैलू वेगळे आहेत. पटकथा उत्कंठा वाढवणारी असून, रहस्य अखेरपर्यंत उलगडत नाही, पण काही दृश्ये आणखी विस्ताराने दाखवण्याची गरज होती. विशेष म्हणजे मुलींची तस्करी होत असताना एसीपी आणि त्यांच्या टिमला सारं काही ताटात वाढून ठेवल्यासारखं समोर येतं. मनोजच्या एन्ट्रीचा सीन दमदार झाला आहे. एक छोटासा धागा एखाद्या मोठ्या स्कँडलपर्यंत कसा नेऊ शकतो हे चांगल्या प्रकारे दाखवण्यात आलं आहे. तपासातील बारकावे, आरोपींचा माग घेण्याची शैली, तंत्रज्ञानाचा वापर योग्य प्रकारे करण्यात आला असून, पार्श्वसंगीत प्रसंगांना साजेसं आहे.

अभिनय : मनोज बाजपेयीने दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'सायलेन्स'मधील कॅरेक्टरचं अचूक बेअरिंग पकडलं आहे. एखादी केस हाती आल्यावर झोकून देऊन काम करण्याची शैली आणि मनोजचा अभिनय प्रेक्षकांना भावणारा आहे. तपासकामात मोलाचं सहकार्य करणाऱ्या सहकाऱ्यांच्या रूपात प्राची देसाई आणि साहिल वैद यांनी लक्षवेधी काम केलं आहे. पारुल गुलाटीला संवादफेकीच्या शैलीवर काम करण्याची गरज आहे. वकार शेख, अनिकेत भारद्वाज, श्रुती बापना, सुरभी रोहरा यांनी चांगली साथ दिली आहे.

सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, तपासकामातील बारकावे, दिग्दर्शन, अभिनय, पार्श्वसंगीत
नकारात्मक बाजू : कला दिग्दर्शन, संकलन
थोडक्यात काय तर समाजात मुलींवर होणाऱ्या गुन्हेगारीला वेळीच आळा न घातल्यास भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते याची झलक दाखवणारा हा चित्रपट एकदा पाहायला हवा.

Web Title: Silence 2 Movie Review: Manoj's powerful performance complements the thrilling storyline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.