"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

By कोमल खांबे | Updated: August 2, 2025 14:23 IST2025-08-02T14:23:11+5:302025-08-02T14:23:55+5:30

१५-२० वर्ष महाराष्ट्रात राहूनही मराठी येत नसेल तर त्याचा अभिमान नाही तर लाज वाटली पाहिजे, असं श्रुतीने म्हटलं आहे.

shruti marathe talk about marathi vs hindi row said they should learn how to speak marathi | "१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी विरुद्ध हिंदी भाषा वाद सुरू आहे. यावर अनेक सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया देत त्यांचं मत मांडलं आहे. आता मराठीसह साऊथ सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री श्रुती मराठेने यावर प्रतिक्रिया दिली आहे. १५-२० वर्ष महाराष्ट्रात राहूनही मराठी येत नसेल तर त्याचा अभिमान नाही तर लाज वाटली पाहिजे, असं श्रुतीने म्हटलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने मराठी विरुद्ध हिंदी वादावर परखड मत व्यक्त केलं आहे. 

"मला असं वाटतं की जे लोक महाराष्ट्रात आज आलेत त्यांच्याकडून तुम्ही मराठी बोलाच ही अपेक्षा करणं खूप चुकीचं आहे. कारण, मी सुद्धा जेव्हा हैदराबाद किंवा चेन्नईला जाते तेव्हा त्यांची अपेक्षा नसते की मी येऊन तमिळ किंवा तेलुगु बोलावं. त्यांचं फक्त एवढंच असतं की तुम्ही प्रयत्न करताय का आमची भाषा बोलण्याचा... मला चित्रपटात काम करायचंय तर माझ्याकडे तो ऑप्शनच नाहीये. महाराष्ट्रात मला इतके लोक माहीत आहेत की जे मराठी नाहीत. ते गर्वाने सांगतात की आम्ही २०-२५ वर्ष मराठीत राहतो पण हमको नही आती मराठी...याचा राग आहे. या गोष्टीचा तुम्हाला कसला अभिमान आहे?", असं श्रुती इसापनिती एंटरटेनमेंट या मराठी युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.  

पुढे ती म्हणाली, "तुम्ही २०-२५ वर्ष महाराष्ट्रात राहताय तुमच्या आजुबाजूला इतके मराठी लोक आहेत. कदाचित तुमच्याकडे काम करणारी सगळी मंडळीही मराठी असतील. पण, तरी तुम्ही इतक्या वर्षात मराठी नाही शिकलात? मला याचा प्रॉब्लेम आहे. हे मला कुठेतरी खटकतं. ज्या पद्धतीने आता मराठी भाषेचा जोर केला जातोय ती पद्धत कदाचित चुकीची असेल. पण, यामागचा जो मेसेज आहे तो बरोबर आहे. तुम्ही एखाद्या राज्यात राहता आणि १५-२० वर्ष त्या राज्यात राहूनही तुम्हाला त्या राज्याची भाषा येत नाही. याची लाज वाटली पाहिजे". 

"आम्ही अपेक्षा करतच नाही की बाबा तू काल आलास आणि उद्यापासून मराठी बोलायला लाग. मी तर ५ वर्ष अपेक्षा करणार नाही. कारण तुला कदाचित ५वर्ष मराठी भाषा शिकायला. पण तुम्ही प्रयत्न किती करताय? तुम्ही अस्खलित मराठी बोला अशी आमची अपेक्षा नाही. पण, अपेक्षा फक्त एवढीच आहे की तुम्ही प्रयत्न करा. आणि म्हणून राग येतोय. ज्या पद्धतीने गुंडगिरी चालूये त्याचा राग येतोय आणि ज्या गर्वाने सांगतात की मराठी शिकणार नाही त्याचाही राग येतो", असंही श्रुतीने सांगितलं. 

Web Title: shruti marathe talk about marathi vs hindi row said they should learn how to speak marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.