शिवदर्शन साबळे आता रंगभूमीवर
By Admin | Updated: November 30, 2014 23:23 IST2014-11-30T23:23:54+5:302014-11-30T23:23:54+5:30
कॅनव्हास’, ‘अजब लग्नाची गजब गोष्ट’ हे व्यावसायिक चित्रपट तर ‘रंग मनाचे’ हा विविध महोत्सवांत गाजलेला चित्रपट दिग्दर्शित केल्यानंतर शिवदर्शन साबळे रंगभूमीवर पदार्पण करत आहे

शिवदर्शन साबळे आता रंगभूमीवर
मुंबई : ‘कॅनव्हास’, ‘अजब लग्नाची गजब गोष्ट’ हे व्यावसायिक चित्रपट तर ‘रंग मनाचे’ हा विविध महोत्सवांत गाजलेला चित्रपट दिग्दर्शित केल्यानंतर शिवदर्शन साबळे रंगभूमीवर पदार्पण करत आहे. एकांकिकांच्या माध्यमातून विशेष यश मिळालेल्या रंगभूमीवर आपला ठसा उमटवण्याच्या दृष्टीने ‘परंपरा डॉट कॉम’ हे नाटक रंगभूमीवर दाखल झाले आहे.
शिवदर्शन साबळे म्हणजे महाराष्ट्रात शाहिरीची परंपरा रुजवणारे शाहीर साबळेंचा नातू आणि संगीतकार देवदत्त साबळे यांचा मुलगा. त्यामुळे आपले पहिले नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणताना त्याने घरच्या संगीत परंपरेचा वारसा पुढे चालवला आहे. हे नाटक नव्या पिढीला
आपलेसे वाटावे, त्यातल्या कथेशी त्यांनी समरस व्हावे, यासाठी त्याने नाटकात पाच गाण्यांचा वापर केला आहे.
विशेष म्हणजे देवदत्त साबळेंच्या सदाबहार संगीताची जादू बऱ्याच कालावधीनंतर प्रेक्षकांना या नाटकातून अनुभवता येईल. सध्या यापैकी दोन गाणी सोशल मीडियावर लोकप्रिय झाली आहेत.
महत्त्वाचे म्हणजे या नाटकाद्वारे ‘दुनियादारी’, ‘अजब लग्नाची गजब गोष्ट’, ‘वन रूम किचन’, ‘झकास’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांची संकलक अपूर्वा मोतीवाले-सहाय या निर्माती म्हणून वैजयंती साबळे यांच्यासोबत रंगभूमीवर दाखल होत आहेत.
‘परंपरा डॉट कॉम’ या नाटकाच्या कुटुंबातील मुलगा आजच्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणारा आहे. या कुटुंबात पळून जाऊन लग्न करण्याची परंपरा आहे. ही परंपरा त्या मुलाच्या आजोबांपर्यंतच्या पिढ्यांनी इमानेइतबारे पाळलेली आहे, पण मुलाच्या वडिलांनी ही परंपरा मोडली.
आता नातवाने ही परंपरा पुन्हा सुरू करावी, ही आजोबांची इच्छा आहे, पण या नव्या पिढीतल्या मुलांची मते काही निराळीच असतात आणि त्यातून नवाच पेच उभा राहून हे हास्यस्फोटक नाटक उभे राहते. सध्याचा आघाडीचा अभिनेता अतुल तोडणकर या नाटकात एका आगळ्यावेगळ्या मध्यवर्ती भूमिकेत आहे.
अतुलसोबत मुग्धा कर्णिक आणि मिलिंद उके हे प्रायोगिक रंगभूमीवर ठसा उमटवणारे कलाकार मुख्य भूमिकेत असून आशय कांबळी आणि रुचिता शेलार हे दोन नवे चेहरे या नाटकाद्वारे रंगभूमीवर येत
आहेत. (प्रतिनिधी)